मनोरंजक आणि रोमांचक विज्ञान केंद्र व तारांगण
आपण दैनंदिन जीवनात अनेक कामांत आपल्याही नकळत विज्ञानाचा उपयोग करत असतो.विज्ञानाचा जितका अभ्यास करावा, जेवढे निरिक्षण करावे तेवढे विज्ञान जास्त मनोरंजक वाटू लागते. ज्ञानप्राप्ती व शिक्षण यांचे 'सामान्य ज्ञान व शास्त्रीय दृष्टीकोन' हे अविभाज्य अंग आहेत. मुलांचा हाच शास्त्रीय दृष्टीकोन व्यापक व्हावा हा हेतू मनात ठेवून आम्ही मुलींना मनोरंजक आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी मुंबई विज्ञान केंद्राला भेट देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे 20 मे 2017 ला आम्ही भेट दिली. नेहरू विज्ञान केंद्र हे वरळी मुंबई येथे असुन 11 नोव्हेंबर 1985 ला सुरू झाले. मुंबईत प्रवेश केला की ईस्टर्न फ्री वे ने येथे लवकर पोहचू शकतो. हे केंद्र होळी व दिवाळी सोडून पूर्ण वर्ष चालू असते. वेळ 10ते6 असून येथे जेवणासाठी कॅन्टीन व पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध आहे.या केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोणार्क च्या सूर्य मंदिर येथे असलेल्या चक्राची प्रतिकृती खुप छान दिसते. ...