वेड लावणारा... हरिहरगड...
हा छंद जिवाला लावी पिसे... तसचं काहीसं झालय माझं, ट्रेकिंग जिवाला करी वेडेपिसे..... ट्रेक म्हणजे माझ्यासाठी निसर्गातली स्वच्छंद भटकंती. सच ही हैं 'इन पहाड़ों की हवांओं में इक नशा सा हैं'.. और वो बढता ही जा रहा हैं. एक दोन अठवडे सरले की याची ओढ उफाळून वर येतेच येते आणि सुरु होतात पुढच्या ट्रेक चे प्लान. नविन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तीन ट्रेक झाले माझ्यासाठी मेजवानीच होती. इच्छा तर असते प्रत्येक अठवड्याला ट्रेक करण्याची पण नेहमी जमेलच असे नाही. निसर्गाशी एकरुप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग, आपण निसर्गाशी बिनधास्त एकरुप व्हायचं. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यात फिरतांना माझ्या डोळ्यात भरतात ते प्रचंड मोठे राॅक पाषाण, काय एक एक रॉक असतात राव या अशा राॅक च्या प्रेमातच पडलीय मी, तुम्ही म्हणाल काय वेड लागलंय या बाईला... पण खरंच वेडंच लावलं आहे ह्या सह्याद्रीतील काळकभिन्न पाषाणानी त्यांच्यातला एक से एक वेगळेपणा सतत मला भारावून टाकतो. तो म्हणजे, बेलाग सुळक्या मधील 'रुबाब', आणि प्रचंड कातळातील दिमाखदारपणा तर खुप भावतो. विविध कातळ, काळकभिन्न रंगाचे, मोहक आकारांचे असे...