वेड लावणारा... हरिहरगड...

हा छंद जिवाला लावी पिसे... तसचं काहीसं झालय माझं, ट्रेकिंग जिवाला करी वेडेपिसे..... ट्रेक म्हणजे माझ्यासाठी निसर्गातली स्वच्छंद भटकंती. सच ही हैं 'इन पहाड़ों की हवांओं में इक नशा सा हैं'.. 

और वो बढता ही जा रहा हैं. एक दोन अठवडे सरले की याची ओढ उफाळून वर येतेच येते आणि सुरु होतात पुढच्या ट्रेक चे प्लान. नविन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तीन ट्रेक झाले माझ्यासाठी मेजवानीच होती. इच्छा तर असते प्रत्येक अठवड्याला ट्रेक करण्याची पण नेहमी जमेलच असे नाही. निसर्गाशी  एकरुप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग, आपण निसर्गाशी बिनधास्त एकरुप व्हायचं. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यात फिरतांना माझ्या डोळ्यात भरतात ते प्रचंड मोठे राॅक पाषाण, काय एक एक रॉक असतात राव या अशा राॅक च्या प्रेमातच पडलीय मी, तुम्ही म्हणाल काय वेड लागलंय या बाईला... पण खरंच वेडंच लावलं आहे ह्या सह्याद्रीतील काळकभिन्न पाषाणानी त्यांच्यातला एक से एक वेगळेपणा सतत मला भारावून टाकतो. तो म्हणजे, बेलाग सुळक्या मधील 'रुबाब', आणि प्रचंड  कातळातील दिमाखदारपणा तर खुप भावतो. विविध कातळ, काळकभिन्न रंगाचे, मोहक आकारांचे असे अंगावर येणारे बेलाग सुळके तर ताठ मान आणि नजर उंचावल्या शिवाय आपण त्यांना पाहुही शकत नाही. म्हणून जरा जास्तच आवडतात.
कोणत्याही गडकिल्यावर जा असे हे मोठ मोठे पाषाण आपल्या स्वागतासाठी तयारच असतात. कधी कधी तर या पाषाणात पायर्‍या खोदून गडावर जाण्याचा मार्ग बनवलेले दिसतात. सह्याद्रीच्या कातळावर प्रेम करणार्‍या माझ्या पूर्वजांनी जिथे जिथे चढाई अत्यंत कठीण आहे आशा अवघड ठिकाणी सुध्दा पायर्‍या कोरून गडावर जाण्याचा मार्ग बनवला आहे त्यांच्या या स्थापत्य कलेसाठी त्यांना मानाचा मुजरा. अश्याच
भक्कम कातळात 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायर्‍यामुळे प्रसिद्ध असलेला आणि कायम ट्रेकर लोकांचा आकर्षणाचा बिंदू ठरलेला हरिहर गड. ऐतिहासिक व अतिप्राचीन असा स्वतःच्या रांगड्या रुपाने कोणालाही स्वतःच्या प्रेमात पाडणारा गड. याला पाहून तर आम्ही वेडावूनच गेलो असा हा हरिहर.

नाशिकच्या पश्चिमेस त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत अनेक गडकिल्ले येतात, त्यातील हरिहर हा प्रमुख किल्ला आहे. त्र्यंबक रांगेचे दोन भाग पडतात एका भागात बसगड, उतवड फणीचा डोंगर, त्र्यंबकगड व हरिहर हे गड येतात आणि दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही येथील प्रमुख नदी आहे. हरिहरगड समुद्रसपाटीपासून 1120 मीटर म्हणजेच 3400 फुट उंच आहे.

फ्रेंड्स आॅफ नेचर असोसिएशन ट्रेकिंग ग्रुपचा 79 वा ट्रेक व नविन वर्षातल्या पहिल्या ट्रेकची सुरुवात हरिहर ट्रेक करुन अगदी दणक्यात झाली.
20 जानेवारीला शनिवारी रात्री 11 वाजता आमची 37 जणांची बस निगडीतुन तळेगाव चाकण मधुन नाशिक कडे रवाना झाली. पुढे ऐके ठिकाणी रात्री एक वाजता जागतिक किर्तीचे सायकलपटु संतोष होली सरांच्या हस्ते नारळ फोडून पुढचा प्रवास सुरू झाला. फोना ग्रुपचे लिडर मंदार थरवल सरांचा वाढदिवस असल्याने त्यांनी सर्वांना कॅडबरी वाटुन व आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊन अगदी शाळेतील फिल अनुभवला.
हरिहरची ओढ इतकी की कोणाला फारशी झोपही लागली नाही. आम्ही नाशिक वरुन त्र्यंबकेश्वर मार्गे पहाटे पाच वाजता निरगुडपाडा येथे पोहचलो. गडाच्या पायथ्याशी असलेले हे गांव. पुणे ते निरगुडपाडा 250 कि. मी. अंतरावर आहे. हरिहर च्या ओढीने सहा तास प्रवास करुन देखील प्रवासाचा ताण अजिबात जाणवला नाही. बसमधून उतरल्या बरोबर पहाटेचा थंडगार वारा अंगावर आला आणि एकदम थंडीने कुडकुडलो. तिथे ऐके ठिकाणी काहीजणांनी शेकोटी पेटवली आणि आम्ही पहाटेच्या थंडीत थोडावेळ शेकोटी चा आनंद घेतला. लगेच एका तासात सर्वजणांनी फ्रेश होऊन इडली चटणीचा नाष्टा केला. तिथल्या एका घरात आधीच चहाची आॅर्डर दिल्याने, नाष्ट्यानंतर गरमागरम वाफाळत्या चहाची लज्जत... फ्रेश आणि थंड वातावरणात आधिकच वाढते.

यानंतर सर्वांना ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व त्या पाळण्याचे आदेश ही दिले. जेवण दुपारी परत येऊन इथेच या गावात करणार असल्याने पाठीवर फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन सात वाजता ट्रेक सुरू झाला.

आता मस्त उजाडलं होतं, दहा बारा घरं असलेलं गांव किती सुरेख दिसत होतं. घराघरातून पेटलेल्या चुलीतून निघणारा धुर, नुकतीच भात छाटणी केलेली शेतं,गोठयातील गाई गुरं, इकडे तिकडे पळणार्‍या कोंबड्या, शेतातील तुडुंब भरलेल्या विहिरी, (पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर तीन तीन भरलेले हांडे घेऊन जाणारी महिला.) ऐके ठिकाणी बैलजोडी भात तुडवत होती.
आणि या शेतांच्या बांधाबांधावरुन आम्ही हे मनोहरी दृश्य पाहत चालत पुढे निघालो. इथून हरिहर आयताकृती भासत होता. अजुबाजुला वाळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात फोटोग्राफीची मजा काही औरच.

आता बर्‍यापैकी चढण चढण्यास सुरवात झाली. अलीकडे ट्रेकर्सनी किल्यावर जाणाऱ्या बर्‍याच वाटा शोधल्यामुळे तशी मळलेली वाट फारशी दिसली नाही. या वाटेवर मधे मधे लिंबूपाणी विकणारे लोक बसलेले आहेत त्यामुळे लिंबूपाणी पिऊन फ्रेश होऊन पुढे जाऊ शकतो. ट्रेक मधे दरवेळी नवनवीन ट्रेक भिडू भेटतातच त्यापैकी एक होती दर्शना नविन ट्रेकर या ट्रेकला आली होती. पहिला ट्रेक असल्याने जरा धास्तावलेली, काही ट्रिक तिला सांगितल्या व तिने त्या फॉलो केल्या हळुहळु तिचा आत्मविश्वास वाढु लागला आणि हा हा म्हणता सेमी हार्ड ट्रेक मस्त पार केला. आता असेच ट्रेकिंग चालु ठेव दर्शना.

ट्रेक कोणताही असो वाट कशीही असो अजुबाजुचं सौंदर्य सर्वजण न्याहाळतात काहीजण ते आपल्या कॅमेर्‍यात कैद ही करतात. पण त्याही पेक्षा काहीना अनेक हटके गोष्टी दिसतात किंबहुना त्यांची नजर अचुक ते टिपतेच. अशीच अचुक पण हटके क्लिक घेणारे आमचे मित्र राहुल दरगुडे यांची अप्रतिम फोटोग्राफी




मला ट्रेक मधे कधीही माथा गाठायची घाई नसते, मधे मधे थांबुन अजुबाजुचं सौंदर्य न्याहाळत फोटोग्राफीची मजा घेत पुढे जायचं असतं मग सोबत कोणी असो वा नसो. पण असं होत नाही कोणी ना कोणी ट्रेक भिडू असतातच. खरतर गड माथ्यावर पोहचल्यावर जो आनंद मिळतो त्याही पेक्षा तिथवर पोहचण्यासाठी केलेला घाटवाटांचा प्रवास तासनतास तुडवलेल्या पायवाटा, दमवणाऱ्या अडवाटांची पायपीट कैक पटीने आनंद आणि समाधान देऊन जाते.
मी, नितिन सर, दर्शना, होली सर आमचा चौघांचा रनिंग रेस चा प्रशांत सरांनी स्लो मोशन मधे केलेलं विडिओ शुट, मस्त झालाय विडिओ प्रशांत सर, मी मीनाक्षी दर्शना अपूर्वा मनोज सरांन बरोबर मस्ती करत , तर मंदार सरांशी गप्पा मारत, व नितिन सरांनी प्रत्येक पॉईन्ट ला आमची केलेली फोटोग्राफी अशी धमाल करत चालत रहायचो. दोन तासाच्या पायपीटी नंतर आता आमच्या समोर तो भव्य हरिहर उभा ठाकला. ज्याच्यासाठी इथवर आलो तो मस्त दिमाखात आमच्या समोर उभा.

 भव्यदिव्य पाषाणाचा खडा डोंगर आणि पाहता क्षणी धडकी भरेल अशा खड्या पायऱ्या,तरीही ओढ कायमच. जसे दिर्घप्रतिक्षेनंतर दोन मित्र एकमेकांना भेटण्यास आतुर असतात तसेच हरिहर आणि आमच्यात झालं होतं. सगळेजण खुपच उत्सुक होते. आता खरं थ्रील सुरू...'याच साठी केला होता इथवर येण्याचा अट्टाहास 'काही मेंबर्स आधिच पुढे गेले होते. प्रत्येकजण कसलीही घाई गडबड न करता त्या खड्या पायर्‍या चढू लागले.

 तरीही 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या असल्याने प्रत्येक पाऊल आडवे टाकत चढावे लागते, प्रत्येकी दोन पायरीत अंतर जरी जास्त असले तरी पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला खोबण्या आहेत त्यामुळे हाताने खोबणीला घट्ट पकडून सावकाश एक एक पायरी चढता येते. सह्याद्रीतल्या कळकभिन्न पाषाणावर प्रेम करणाऱ्या माझ्या पूर्वजांचे स्मरण करून या सरळसोट शंभर पायऱ्या पार केल्या. इथूनच शेंदूर लावलेल्या कमानीतून किल्यावर प्रवेश करता येतो. तसेच पुढे डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी कपार लागते. या कमानीतून समोरची कपार व तिच्या पलीकडील डोंगर अप्रतिम नजारा डोळ्यात भरतो वाह! या कपारीला वळसा घालून जाताना डाव्या हाताला एक नेढे दिसते.

पुढे इथेही पाषाणात बाजूने कोरलेले दोन जिने पार केल्यानंतर, दोन भव्य पाषाणाच्या मधुन एक जिना वर जातो व पुढे एका पाषाणाच्या आतुन बाहेर निघतो, इथेच कोथाळीगड ची अठवण करुन देतो.

अजून दोन जिने पार केल्यानंतर समोर डोम दिसतो हेच ते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. इथून उजव्या बाजुने थोडे वर चढत गेले की पठार लागते. तसे हे पठार निमुळते आहे व मधेच उंचवटा आहे. या उंचवट्यावरुन पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला खाली एक तलाव आहे व त्याच्या बाजूला हनुमान व शंकराचे मंदिर आहे. आम्हाला पायथ्यापासून दिसणारी हरिहरची आयताकृती कातळीभिंत व बाजूची दरी आता स्पष्ट दिसत होती.

 या दरीच्या बाजूने पुढे गेल्यावर समोर हरिहरचं शिखर दिसु लागतं.

 हे शिखर फारच निमुळतं असल्याने पहिला ग्रुप खाली उतरल्यावरच आम्ही वर चढू लागलो. इथे मनोज सरांनी सर्वांना अत्यंत काळजीपूर्वक वर चढवले. शिखरावर 10 ते 15 च लोक उभे राहु शकतील इतकीच जागा आहे. त्यात वाऱ्याचा जोर असल्याने तोल जाऊ शकतो म्हणून कडेला जाऊ नये, सेल्फी अजिबात काढू नये. अशा ठिकाणी फक्त निसर्ग सौंदर्य न्याहाळावं डोळ्यात साठवून घ्याव आणि लगेच उतरावं. शिखरावर जमेल तेवढ्यांचा ग्रुप फोटो घेऊन आम्ही एक एक जण उतरु लागलो.

 ग्रुप लिडर निकाळजे काकानीं प्रत्येकास उतरण्यास मदत केली.
इथून उजव्या बाजूला थोडे उताराला गेले की खुपच निमुळतं पठार आहे. इथे वाटेत पाण्याची पाच टाकी आहेत. एक दगडी कोठी आहे. इथून ब्रह्मगिरी अतिशय सुंदर दिसतो. समोरील एक बाजूच्या सर्वच डोंगररांग व दुसऱ्या बाजूला खाली वैतरणाचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. इथून परतताना एका टाक्यातील पाण्याने तोंड धुतले, चार तास चालून थकलेला जीव या थंड पाण्याने एकदम फ्रेश झाला.

आता गड उतरण्यास सुरूवात केली. म्हंटलेच आहे ना "चढण्यात शान आहे पण उतरणे अनिवार्य आहे". चढण्याचा थ्रील अनुभवल्या नंतर, खरी कसोटी लागते ती उतरण्याची. उतरताना पूर्णपणे स्वतःवर नियंत्रण ठेऊन सावकाश एक एक पायरी उतरावी लागते.


जिथे जसे जमेल तसे बॅलन्स सांभाळत प्रत्येकजण उतरत होते. काही ठिकाणी पायऱ्यांमधील अंतर जास्त असल्याने बसत बसत उतरावे लागते. उतरताना बाजूची दरी आता चांगलीच दिसू लागली होती. काहींचे भितीने पाय थरथरत होते पण एकदा का मनाने ठरवलं आणि दुसरा पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा भिती निघून जाते. उतरताना प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून उतरावे. कारण तोल गेला दुसर्‍याला धक्का लागला तर सरसकट सगळे खाली जाण्याची शक्यता असते म्हणून शांतपणे उतरणे गरजेचे असते. अशा 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरीने उतरल्या, अशाप्रकारे हरिहर च्या पायऱ्यांचा हवाहवासा रोमांचकारी थरार सगळ्यानी अनुभवला.

आता सात तासाच्या ट्रेक नंतर प्रचंड भूक लागलेली
खाली उतरून निरगुडपाड्यातील एका घरात अतिशय रुचकर भोजनाचा आनंद घेतला. हरिहरला पायथ्यापासून निरोप देत साडेतीन वाजता आमची बस पुण्याकडे निघाली.

 एकाच ट्रेक मधे कलावंतीण, कोथाळीगड, राजगड या दुर्गांची अनुभुती देणारा हरिहर. असा हा ओढ लावणारा हरिहर एकदा अनुभवायला काय हरकत आहे. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक