पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩
13 व 14 जुलै 2024 ...
जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे हरलो तरी इतिहास घडला पाहिजे.... 🚩 🚩
घोडखिंडी ची झाली पावनखिंड
ती आषाढ पोर्णिमेची रात्र, पोर्णिमा असूनही किर्रर काळोख कारण गच्च ढगांच्या गर्दीत गडप झालेला चंद्र, दाटून आलेलं
आभाळ आणि कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी परिस्थिती, तरीही मिट्ट काळोखात, निसरड्या वाटा, पण कसलीही तमा न बाळगता...
भर पावसात चिखलातून बाजी फुलाजी मावळे आणि पालखी च्या दुतर्फा धारकरी अनवाणी धावत होते फक्त धावत होते, आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना फक्त विशाळ गड गाठायचा होता. सिद्धी च्या विळख्यातून सुटून... फक्त गड गाठायचा होता, कारण एकच
आपला राजा सुखरूप गडावर पोहोचला पाहिजे, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे! इतकंच त्यांच्या डोक्यात होतं. 🚩 🚩 अशी ही एका थरारक रणसंग्रामाची रात्र....... शक्ती आणि युक्ती ची अनोखी रणनिती... . कसा घडला असेल शक्ती आणि युक्ती चा अनोखा मिलाफ...हाच तो पन्हाळ गड यालाच पडला होता बलाढ्य सिद्धी चा विळखा, आणि हाच विळखा तोडून महाराजांनी रातोरात विशाल गडाकडे कूच केली होती. इथूनच झाली होती मोहिमेला सुरुवात...किल्ले पन्हाळा गडावरून...
तब्बल 21 तासात 68km खडतर अन्तर धावत पार करून विशाळ गड गाठला. केवळ आणि केवळ आपले वीर बाजी, फुला जी, आणि स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशिद, व बांदल यांच्या मुळे, केवळ यांच्या बलिदानामुळे ... लाखाचा पोशिंदा वाचला होता.... स्वराज्यासाठी🚩
सन 1660, 12 जुलै ची ती रात्री.. पन्हाळगडावरून सुरू झाली होती एक मोहीम चिडीचूप रण संग्रामाची .. आणि ती पूर्ण झाली 13 जुलैला घोड खिंडीत....
वीर बाजी, फुलाजी आणि मावळे यांच्या बलिदानातून पावन झालेली हिच ती पावनखिंड....
या विरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 12 व 13 जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात येते.
म्हणून पन्हाळगडावरून दरवर्षी विविध ग्रुपच्या वतीने या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केलं जातं. या मोहिमेत हजारो तरुण तरुणी तसेच अगदी वय वर्ष 6 ते 60 वर्षा पर्यंत सगळे आज 13 जुलै 2024 रोजी सहभागी झाले होते. आजची आमची मोहीम सह्याद्री ट्रेकिंग फौंडेशन पुणे व स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्यावतीनं आयोजित करण्यात आली होती .
दिवस पहिला..
सह्याद्री ट्रेकिंग फौंडेशन पुणे (STF) च्या 3 बस 12 जुलै ला रात्री 12 वाजता पुण्यातून कोल्हापूर च्या दिशेने धावू लागल्या आणि सकाळी 6 ला कोल्हापुरात दाखल झाल्या. बस मधुन उतरल्या बरोबर पावसामुळे वातावरणातील गारठा लगेच जाणवू लागला. पावसाळी वातावरण असल्याने सकाळी सकाळी चहा टपरी वर लगबग दिसू लागली आणि त्याबरोबर कोल्हापुरी लय आजुबाजूला ऐकू येऊ लागली व्वा झक्कास.
सर्वजण फ्रेश होऊन, नाश्ता साठी पुढे निघालो. युद्धकला प्रशिक्षण संस्थेने चहा नाष्ट्याची सोय आधीच करून ठेवली होती. गरमागरम चहा नाश्ता करून आम्ही 8 ला पन्हाळा वर पोहचलो, पण दाट धुक्यामुळे समोरील दहा फुटावर चे काही दिसत नव्हते. त्यात पावसाची रिपरिप चालूच होती. लगोलग बस मधेच आवरून ट्रेकिंग गेटअप मधे खाली उतरलो आणि बरोबर आणलेल्या जास्तीच्या एक्स्ट्रा बॅग संस्थेने आधीच तयार ठेवलेल्या गाडी मधे जमा केल्या, आता त्या डायरेक्ट आम्हाला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी मिळणार होत्या. स्वतःजवळ छोटी सॅक त्यात पाणी आणि थोडा खाऊ आणि स्टिक, बाकी पावसामुळे रेनकोट आधीच अंगात चढवला होता. छत्री कॅप सर्व घेऊन सगळे एकदम फुल फॉर्म मध्ये तयार झाले. सगळीकडे पसरलेलं दाट धुकं हलक्या सरी सगळेच कसे रंगबिरंगी गेटअप मधे अगदी खुलून दिसत होते. गडावर समोर असलेल्या वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्या भोवती आमची टीम जमू लागली . तेथे आधीच जमलेले ट्रेकर्स हजारोंच्या संख्येने उपस्थित होते त्यात आमची अजून शेकडा भर पडली. आता पाऊस थांबला होता. सकाळचे 8 वाजले होते पन्हाळा गड अगदीच ट्रेकमय झाला होता. बाजी च्या पुतळ्यासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले ट्रेकर्स या ऐतिहासिक शौर्य यात्रेचे साक्षीदार बनण्यासाठी किती उत्सुक आहेत हे त्यांचा उत्साहच सांगत होता. असा हा रोमांचित प्रफुल्लित माहोल धुकंमय वातावरणात भरून राहिला होता. जोशपूर्ण आवेशपूर्ण वीर बाजीच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतांना आम्ही धन्य धन्य झालो. 🚩
तुरुक वाडी तून पुढे डाव्या हाताला शेतातून डोंगराची चढण चढून जावा किंवा सरळ घाट रस्ता पकडा, एकूण एकच दोन्ही वाटा पुढे एकत्र मिळतात. आम्ही घाट रस्ता निवडला कारण डोंगर चढण जरी शॉर्टकट असली तरी गर्दी जास्त होती पण दमवणार नक्की. पाऊस कध्धीच थांबला होता आणि छान ऊन पडले होते. आम्ही घाट रस्ता निवडला ते बरंच झालं असा वळणा वळणा चा रस्ता खूप सुरेख दिसू लागला उजव्या बाजूला हिरवीगार दुलई आणि डाव्या बाजूने सतत नजरेत येणारा पन्हाळा खूपच सुंदर दिसत होता. मग काय घाट रस्त्याने छान गप्पा टप्पा, फोटोग्राफी करत करत परत एकदा पन्हाळ्याला नजरेत साठवून पुढे निघालो आणि एक तासात म्हाळूंगे वाडीत आलो. इथून थोडा वेळ चढ चढून गेलो आणि समोर पाहतो तर काय, निसर्गाचा सुंदर नजराणा आमच्या पुढ्यात हात पसरून उभा..
अतिशय अफाट असे चारही बाजूंनी पसरलेलं सुंदर भव्य पठार लागले. पाठरा वर आल्या आल्या 360 डिग्री मधे नजर टाकली. पण, हे पाठर इतके विस्तीर्ण आहे की एका दृष्टीक्षेपात बसणे कठीण....
जिकडे पहावे तिकडे हिरव्याकंच तृणमूलांचे गालीचेच गालिचे चोहीकडे, असेच वाटत होते. वर ढगांची अफाट गर्दी आणि पायाखाली सुंदर हिरवळ आणि चारही बाजूंनी पसरत चाललेली धुक्याची चादर अहाहा अश्या या मंत्रमुग्ध करणार्या वातावरणातून हिरव्यागार गालिच्यावरुन चालताना जी स्वर्ग अनुभुती मिळतेना ती शब्दात व्यक्त करणे ही कठीण! व्वा ...काय विलक्षण अनुभव! या ठिकाणी पाऊस संपल्या नंतर म्हणजे सप्टेंबर मधे परत एकदा यायला पाहिजे. तेंव्हाचा नजाराही काय बघण्यासारखा असेल ना ... कल्पना करूनच छान वाटतय. कोल्हापूर पासून हे मसई पठार फक्त 7km अंतरावर आहे.
पाठार पूर्णपणे जांभ्या खडका पासून बनलेले असल्याने पूर्ण पायवाट लाल माती ची आहे, तर सभोवताली 500 ते 600 फूट खोल दरी आहे. या पठाराचे एकुण क्षेत्र 913 एकर असून पठाराच्या सुरुवातीलाच फलकावर याबद्दल माहिती दिली आहे. पठारावर असणार्या मसाई देवीच्या मंदिरामुळे मसाई पठार असे नाव पडले असावे.
यावर नैसर्गिक पाण्याचे तलाव आहेत, बाराही महिने यात पाणी असते. यातील पाणी पांढरे दिसत होते. पाण्यात बहुदा जास्त प्रमाणात खनिजे असावीत, तेंव्हाच असे पाणी दिसते.
असे हे सात पठाराचे मिळून बनलेले विस्तीर्ण विलक्षण सुंदर असे मसई पठार. निम्मे पाठार चालून झाले असेल नसेल तोच प्रचंड गर्दी केलेल्या ढगांनीधुवाधार बरसायला सुरुवात केली. त्यात भरीस भर म्हणून प्रचंड धुकं आणि तुफान वारे एकाच वेळी तिघांनी हजेरी लावली. मग सुरू झाली चिखलातून चालण्याची कसरत चाप चाप आवाज करत घसरत पडत एकमेकांना सावरत एकदाचे मसई पठार पार झाले पण त्यातही खूप मजा आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटेवरून जातांना प्रत्येकाच्या चेहर्यावर एक समाधान दिसून येत होते. जसे पाठार उतार होऊ लागलो तसे जंगल सुरू झाले. थोड्यावेळाने पावसाचा जोर कमी होऊ लागला, पण दगड धोंड्यातून पाया खालून सतत चिखल, पाणी चालूच होतं. जंगल वाट संपली की परत डांबरी रस्ता लागला. . या रस्त्यावरून पुढे गेले की कुंभार वाडी आणि पुढे खोत वाडी येते .
येथेच आमच्या दुपारच्या जेवणाची सोय संस्थेमार्फत करण्यात आली होती. पन्हाळ गडावरून खोतवाडी गाठेपर्यंत आम्हाला साडेपाच तास लागले. ग्रुप मधील बरीच मंडळी आधीच पोहचली होती आणि खूप जण तर जेवणखाण उरकून बसली होती. कोल्हापूरात सकाळी लवकर नाष्टा केल्या मुळे, आता मात्र प्रचंड भूक लागली होती, गरम गरम मटकी भाजी आणि चपाती भरपेट खाऊन पोट शांत झाले. आपापल्या प्लेट स्वच्छ धुऊन बॅग मधे ठेऊन ठेवल्या. जेवताना काढुन ठेवलेले ओलेचिंब चिखली बूट परत पायात घालायला जिवावर येऊ लागलं, पण त्याशिवाय पर्याय ही नव्हता. खोतवाडीतून पुढे धनगर वाड्या पर्यंत पूर्णपणे चिखलमय शिवार...... बरीच मंडळी चिखलातून कशीबशी सावरत पुढे जात होती. चिखलात रुतलेल् पाहिलं पाऊल अपार मेहनत घेऊन उचलून पुढे टाकावं तर दुसरं रुतून बसायचं . शरीराचा तोल कधी कोणत्या अँगल मधे जाईल सांगता यायचे नाही. कधी पडता पडता सावरायचं आणि गेलाच तोल तर गणपती बाप्पा मोरया! असा हा घसरून पडण्याचा खेळ छान चालू होता. ही चिखलातली चिखलमय कसरत सर्वानी मस्त एंजॉय केली. पूर्ण वाट भात पिकातून जात असल्याने शेताच्या बांधावरून चालताना दोन्ही बाजूला वार्यावर झुलनारं पीक अतिशय सुरेख दिसू लागलं. शेतातली वाट हळूहळू संपत आली आणि धनगरवाडी च्या पुढे परत जंगलातून वाट सुरु झाली.. वाटेतून एक दोन मोठे ओहोळ पार करावे लागले बाकी छोटे छोटे ओहोळ सतत वाटेवर लागतात. पुढे अजून दोन तीन वाड्या लागल्या चाफेवाडी, करपे वाडी.... डांबरी रस्ता जरी वाड्या पर्यंत पोहोचला असला तरी घरं अजून दगड मातीचीच होती वाडीत जेमतेम मोजकीच कौलारू घरं दिसत होती. ती छोटी छोटी कौलारू घरं हिरव्यागार कुराणात अतिशय सुंदर दिसू लागली . दुपारचे तीन वाजले होते प्रत्येकवेळी पुढची वाडी आली की वाटायचे आली वाटतं आपली मुक्कामाची जागा पण कसलंच काय, ती अजून पुढे असायची .. या मार्गावर बर्याच छोट्या छोट्या वाड्या लागतात.
कारपे वाडी पासून पुढे निलगिरीचे घनदाट जंगल जसं सुरू झालं तसा पावसाचा जोर वाढला, जसा पावसाचा जोर वाढला तसं जंगल धुक्याने भरू लागलं आणि समोरची वाट धूसर होऊ लागली. दिशादर्शक बाण सोबतीला होतेच पण त्याहीपेक्षा ठिकठिकाणी बांधलेल्या केशरी रिबिन ने आमची जास्त साथ दिली.... हो अश्या अफाट पसरलेल्या जंगलात कित्येक फसव्या पायवाटा दिसतात तुम्ही कुठेही भरकटू शकता. अश्या वेळी ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या वर झुडपांवर बांधलेल्या रिबिन मार्गावरून जात रहावं. म्हणजे वाट चुकणार नाही. अश्या ठिकाणाहून चालताना कुजलेल्या पाला पाचोळ्या चा एक निराळा वास येत राहतो.
सद्यस्थितीत फक्त पन्नास टक्के जंगल राहिले आहे म्हणे, असे असून मी याला इतके घनदाट म्हणतेय म्हणजे शंभर टक्के जंगल किती घनदाट असेल.. विचार करा त्यावेळी तर किती अफाट असेल आणि अश्या अफाट किर्र जंगलातून जाताना एखादं जंगली श्वापद कुठून कसं समोर येईल आणि काय होईल.. त्यांचे किती भयंकर आवाज येत असतील, या विचाराने च अंगावर काटा उभा राहिला ' आणि हे माहित असून सुद्धा झपाट्याने वाट कापत जाणारे आपले शूरवीर इथून, याच मार्गावरून गेले होते या विचारानेच भारी वाटू लागलं आणि त्याच वाटेवरून चालतांना मन अभिमानाने भरून आलं. हळू हळू पावसाचा जोर कमी झाला धुकं ही विरळ होऊ लागलं आणि मूळचच सुंदर असलेलं जंगलातल वैभव अधिकच सुंदर दिसू लागलं. पावसाने ओलेचिंब झालेल्या आम्ही जंगल वैभव डोळ्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतले.
या निलगिरीच्या जंगलातून बाहेर पडलो, पण पुढचे जंगल संपता संपत नव्हते जसे बाहेर पडलो तसे खूप मोठे पठार लागले आणि इथून तिथून सगळी भात शेती. पठार संपत आले तसे आमची मुक्कामाची मंजिल दिसू लागली आणि काय आनंद झाला म्हणून सांगू... कारण सकाळ पासून पायांना कसलीही उसंत न दिलेले आम्ही आता फक्त आनंदाने उड्या ch मारायचो बाकी होतं, जी काही विश्रांती मिळणार होती ती इथेच या ठिकाणी. संध्याकाळी 5 वाजता पोहोचलो बुवा आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आंबे वाडीत.....पन्हाळा ते आंबे वाडी 25 किलोमीटर पायपीट झाली, एकूण साडेसात तास लागले मुक्कामी यायला. अजून बरीच मंडळी मागे होती. काही आधीच पोहोचली होती. संस्थेचे नियोजन व्यवस्थित होतं. या ठिकाणी
कोणत्या ग्रुप ला कोणती वाडी हे आधीच ठरलेले असल्यामुळे तुमच्या वाडीत फक्त तुमच्याच ग्रुप चे सदस्य असतात. दुसर्या ग्रुप ला दुसरी वाडी असे. इथेच
एके ठिकाणी आमच्या एक्स्ट्रा लगेज बॅग आधीच आणून ठेवल्या होत्या. तसं पाहिलं तर वाडीत हातावर मोजण्याइतपत कौलारू घरं होती. आपापल्या बॅग घेऊन, आमची राहण्याची सोय केलेल्या घरात आम्ही महिला मंडळ एकदाचे पोहचलो. दिवसभर डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत नखशिखांत भिजलेले असल्याने कधी एकदा कोरडे होतोय असे झाले होते. तासाभरात सगळ्याजणी मस्त आवरून, बदललेले ओले कपड़े आणलेल्या प्लास्टिक बैग मधे ठेऊन, जिकडेतिकडे सगळं ठीकठाक ठेऊन सगळे अगदी कोरडेठाक होऊन एकदाची चटई वर पाठ टेकवली अहाहा काय बरं वाटलं म्हणून सांगू , दिवसभर पावसात भिजून चिखलात चालून चालून थकलेल्या पायानां जरा आता विश्रांती मिळाली. बाहेर पाऊस चालूच होता, पण क्षणभर साठी सुद्धा बाहेर जाण्याची ch काय पाहण्याची सुद्धा कोणाची इच्छा होत नव्हती... थोड्याच वेळात सगळ्यासाठी गरमागरम चहा आला. मस्त पैकी चहा घेऊन गप्पा मारायला सुरुवात झाली. वैशाली ने आणलेले तिळाचे तेल सगळ्यानी तळपायाला लावुन मालीश केली. गप्पा मारता मारता काही नव्याने ओळखी झाल्या. आम्ही ज्या घरात राहिलो होतो ते कौलारू घरं खूप छान होतं. मातीने सारवलेलं, मातीच्या भिंती , स्वयंपाक घरात चूल आणि गरजेपुरते सामान. घराच्या मागच्या बाजूला गोठा, शहराशी कसलाही संपर्क नाही. हा पण वीज गावोगावी पोहोचल्यामुळे घरात एक एक बल्ब होते. पूर्णपणे शेतीवर जीवन जगणारी माणसं... खऱ्या अर्थाने निसर्गात निसर्गाशी एकरूप झालेली. दिवसभर पडणार्या पावसामुळे बाहेर इतका गारठा झाला असून आत मात्र उबदार भिंती, इथल्या माणसांसारख्याच... किती साधी असतात ही माणसं कसलाही विचार न करता रहायला जागा देतात अगदी निःसंकोच मनाने. . कुठून येतं इतकं असेल इतकी उदार भावना, नाहीतर शहरात असे घडेल तरी का? असो, आता रात्रीचे 8 वाजून गेले होते, छान मजा मस्करी चालू होती तेवढ्यात गरम गरम जेवण आले. नव्याने भेटलेल्या आणि जुन्या मैत्रिणीनी सगळ्यांनी मिळुन गप्पांच्या मैफली बरोबर गरमागरम जेवणावर मस्त ताव मारला. अख्खा मसूर आणि मऊ लुसलुशीत भात दिल खुश हो गया 😃😃 नऊ साडे नऊ ला झोपी गेलो.
14 जुलै....
पहाटे पहाटे उठून महत्त्वाची कार्य आटोपून तयारीला लागलो. रात्रभर पाऊस चालूच होता. सगळ्यांचे होई पर्यंत मस्त वाफाळता चहा आला... चहा आणि उपीट खाऊन, पटापट आवरून घेतले. घराबाहेर काढून ठेवलेले रात्रभर भिजलेले बूट केविलवाण्या अवस्थेत माझ्याकडे बघत होते, मग मलाच त्यांची दया आली आणि अत्यंत हिमतीने त्यांना माझ्या पायात चढवले थंडगार पडलेलं रेनकोट अंगात घातले No option only action पावसाळी ट्रेक अनेक केले पण पावसाळी कॅम्पिंग चा पहिलाच अनुभव.
जिथे राहिलो त्या घरातील प्रेमळ कुटुंबाचा निरोप घेऊन 7.30 ला आंबे वाडी सोडले आणि मोहिमेतील मुख्य लक्ष्य असलेल्या पावनखिंड कडे कूच केले पुढे अजून बर्याच वाड्या लागणार होत्या. तसं पाहिलं तर पन्हाळा ते पावनखिंड पर्यन्त नऊ दहा वाड्या तरी लागत असतील. आंबेवाडी तून डांबरी रस्ता वरून पुढे आलो आणि समोर भल्या मोठ्या चिखलमय वाटेने स्वागत केलं. काल वाटत होतं किती भयंकर चिखलातून चालतोय पण आज त्याच्याहून दुपटीने चिखल 😭घसरडी वाट आणि पाऊस चालूच. या मोहिमेत चिखलातून चालावं लागतं हे ऐकून होते. जेंव्हा प्रत्यक्षात यातून चालू लागले तेंव्हा कळाले चिखलातून चालणे इतके सोपे नाही यातून
बूट आख्खा रुतण्या इतपत घोट्यापर्यंत चिखल होता.
चालण्याची कसरत ही करावी लागते ती वेगळी . पाय जड व्हायचे गती मंद व्हायची. पूर्वी म्हणे गुडघ्या पर्यंत चिखलाचा सामना करावा लागायचा अगदी खरंय, काही काही ठिकाणी असा चिखल लागतो . बर्याच ठिकाण चे ओहोळ गुडघ्यापर्यंत पाण्यातून पार करावे लागायचे.
ट्रेक दरम्यान काहींना जळू चिकटले होते . दुसर्या दिवशी या वाटेवर जळवा आहेत त्यासाठी खबरदारी म्हणून साचलेल्या पाण्यात थांबू नये. शक्यतो झाडांना हात लावू नये. अगदी जळू अंगाला कुठे लागली तर तिथे लगेच painkiller स्प्रे करावा जळू लगेच जागेवरून खाली पडते. Painkiller नसेल तर मीठ,हळद चुना त्याजागी टाकावा. प्रतिबंध म्हणून ट्रेकच्या आधी शूज वर स्प्रे मारून घ्यावा. आम्ही तसेच केले. माझी मैत्रिण शितल ने painkiller स्प्रे आणला होता त्यामुळे आम्ही जळू पासून वाचलो.
रिंगेवाडी, पाटेवाडी, अश्या बर्याच वाड्या पार करत आम्ही पुढे जात. पाटेवाडी नंतर अजून एक जंगल लागले. जंगल पार करून परत शेताच्या बांधावरून पुढे गेलो इथून पुढे चिखलातून चालण्याचा खरा थरार सुरू झाला पहिल्या दिवशी पेक्षा दुसर्या दिवशी ची 70%वाट चिखलातून होती. बरेच जण इथे घसरून पडत होते. चिखल वाट संपली की ओहोळ ओढा लागायचा त्याच्यात बूट धुऊन निघायचा... बूट धुऊन निघाला नाही तोच परत चिखलातून जावं लागायचे. असा चिखल पाणी चिखल पाणी क्रम चालूच होता. चालून चालून कोणाच्या पायाला फोड आले होते तर कोणाच्या पायाची त्वचा सोलवटून निघाली होती. वाहत्या पाण्यातून चालताना का कोणास ठाऊक पण बरं वाटायचं. पाटेवाडी नंतर बराच मोठा जंगल पट्टा पार करताना मधेच एक भला मोठा पांढरा शुभ्र ओढा लागला. त्याला असाच का पार करू? नाही अजिबात नाही. एकदाचा तो मोबाईल रेनकोट सॅक काठी एका मोठ्या दगडावर ठेऊन टाकली आम्ही सगळ्याजणी यथेच्छ ओढ्यात उतरलो आणि मनसोक्त खेळून घेतलं. व्हालेंटीअर
ने शिटी मारली तेंव्हा कुठे ओढ्यातून एक करत बाहेर येऊ लागले. पाऊस चालूच होता
पुढे बर्याच वेळा नंतर जंगलातून बाहेर पडलो. पुढे सुकाम्याचा धनगरवाडा लागला आणि त्याच्या पुढे म्हसवडे. म्हसवडेतून पुढे पांढरपाणी ला जायला डांबरी रस्ता लागतो.
या रस्त्याने तुम्ही पांढरपाणी ला जाऊ शकता किंवा जीप टेम्पो इतर वाहनाने ही डायरेक्ट पावनखिंड ला जाऊ शकता. असे दोन पर्याय निवडता येतात. बरीच वयस्क मंडळी वाहनांनी गेली तर काही चालत. आम्हीही चालत पुढे निघालो. काही अन्तर
चालून गेलो तर उजव्या बाजूला शिवकालीन मार्ग असे लिहलेली कमान दिसली. दुसर्या ग्रुपची काही ट्रेकर्स या मार्गे निघाली आम्ही पण 11 जण त्यांच्या बरोबर निघालो कारण हा मार्ग इथून पांढरपाणी ला जात होता. परत एकदा जंगल वाट सुरु झाली. पण या वाटेत दोन मोठे ओढे लागले. पहिला ओढा खूप खोल होता व भरून वाहत होता. ओढ्यावरून पलीकडे जाण्यासाठी ओढ्यावर फक्त एक ओंडका टाकलेला होता. एक पाऊल बसेल इतकाच त्याचा आकार आणि भिजलेला असल्याने पाय सटकण्याची भीती. तेवढ्यात एक जण बेक्कार आपटला. तसे प्रत्येकजण सावकाशपणे एक एक पाऊल टाकत ओंडका पार करू लागले . सरतेशेवटी काही जणांनी ओंडक्या वर बसुन सरकत सरकत ओढा पार केला. दुसरा ओढा मोठा असून पाणी प्रचंड वेगाने वाहत होते तिथेही ज्यांच्या बरोबर आम्ही निघालो होतो त्या पुण्याच्या श्रीराम ग्रुप ने हातांची साखळी करून आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित पलीकडे घेतले. इथल्या वाटेवरच असलेली आया बहिणी साठी महाराजांनी बांधलेली बावडी म्हणजेच विहीर दिसली,पिंडी च्या आकाराची विहीर पाण्याने गच्च भरली होती. पाऊस वाढतच चालला होता. या रानातून बाहेर पडलो व परत रस्त्याला लागलो. आता पाच एक किलोमीटर वर पावनखिंड होती. पावसाचा प्रचंड जोर वाढला, तसा राप राप पाऊस सुरू झाला तुफान वारं सुटलं तोंडावर पावसाचे तडाखे बसू लागले. पुढचे सगळे धुरकट झाले... आम्ही पण झपाझप पावलं उचलली. तुफान वेगा मुळे झाडं इतकी वेगाने हालत होती की, एखादं झाड पडते की काय वाटू लागलं. आम्ही पण भरधाव वेगाने म्हणजे जवळ जवळ पळतच निघालो. रस्त्याच्या दुसर्या बाजूने वाहनं जात होती.
काल पासून सुरू झालेली एकूण 51 किलोमीटर ची पदभ्रमंती .... आज या पावन भूमीवर येऊन पूर्ण झाली.
दुपारी 2 वाजता आम्ही पावनखिंड ला येऊन पोहचलो. पाऊस आणि सगळीकडे दाट धुके त्यामुळे आजुबाजूला काही स्पष्ट दिसत नसले तरी समोर उंच दगडी मनोरयावर दिग्विजयाचा केसरिया दिमाखात फडकत होता. 🚩 🚩
ध्वजा ला वंदन करून खिंडी कडे जाऊन
या विरांच्या स्मरणार्थ बांधलेल्या पवित्र स्थळावर नतमस्तक झालो. बाजीप्रभूंच्या वीर स्मृतींना अभिवादन करून धन्य धन्य झालो. 🙏🙏
ही मोहीम म्हणजे इतिहासाची उजळणी... प्रत्येक पावलागणिक ऊर अभिमानाने भरून येतो. 51 किलोमीटर चा आव्हानात्मक प्रवास आपल्या मानसिक बळाचा कस लावतो. हे मात्र खरंय!
आयुष्यात एकदा तरी निसर्ग प्रेमी, शिवभक्तांनी हि मोहिम करावी. 🚩 🚩 शूर वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाट आम्ही अनुभवली. प्रचंड पाऊस असल्याने खिंडीत जाणारा मार्ग प्रचंड वेगाने वाहणार्या धबधब्या मुळे पोलिस बंदोबस्तात बंद करून ठेवला होता.
त्यामुळे दुरून वाहत्या पाण्याचे रौद्ररूप पाहून माघारी फिरलो. इथून जवळ असलेल्या भातआळी येथे एका मंदिरात आमची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. इथे ओल्याच कपड्यावर जेवण करून तिथे एका घरात कपडे बदली करून छान कोरडे ठाक होऊन बस मधे येऊन बसलो पण पाऊस काही थांबायचे नाव घेईना सरतेशेवटी सगळ्यांची आवराआवर झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कराड मार्गे पुण्याकडे रवाना झालो.
या दोन दिवसात माझ्या सख्या शितल, वैशाली, प्रिती आम्ही ही मोहीम एन्जॉय केली.
तयारी पावनखिंड मोहिमेची....
एक लगेज बॅग प्रत्येक वस्तू कपड़े प्लास्टिक पिशवीत घालून पॅक करावेत . ट्रेकिंग बॅग वेगळी घ्यावी. पाणी बॉटल, कोरडा खाऊ, first-aid बॉक्स, CTR चेच बूट, दोन जोड सॉक्स, डेटॉल स्प्रे, आवश्यक मेडिसीन.
सह्यवेडी सुर 🚩
#Sahyavedi Sur
सुरेखा पवार.... पुणे
पूर्ण मोहीम वीडियो 👇
https://youtu.be/_sMcOMhMxwA?si=yBz3Ua-rZCIpQAhX
मोहिमेतील फोटो खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता .
https://drive.google.com/drive/folders/1R9V3h4EGM4srRh40QY_VEPiBs8mF4u1M
https://photos.app.goo.gl/BtYJwTmWZyPoTgPv8
खूप छान लिखाण.... 👌 शक्य असल्यास ही मोहीम करायला नक्की आवडेल.
ReplyDeleteMast 👌👌
ReplyDeleteअप्रतिम शब्दांकन Live Telecast !!!
ReplyDeleteKiti sunder shabdat pavankhind mohimeche varnan keles💐🙏
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteसुंदर व वाचनीय
ReplyDeleteमी ही मोहीम मागचे वर्षी केली होती...फारच कस लागतो ट्रेकर्स चा...त्यात माझी hip replacement surgery झालेली पण खचून जाऊ नये नव्या उमेदीने वाटचाल करा...रस्ता हा मिळतोच.... मस्त लिखाण
ReplyDeleteNo words…Just awesome………
ReplyDeleteGreat....👍👍
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete