अंधारबन.... कॉम्बो थ्रील पॅकेज

पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम 🔥 भजी आणि चहा आहाहः....! असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खरं तर हे सगळं अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक!
                                               चला तर मग आज आपण पावसाळी ट्रेक ला जंगलात जाऊ आणि ते जंगल 2100 फुट उंचावर आणि घनदाट असेल तर...!!! आयू आला ना पोटात गोळा!!!!!!! एवढ्या उंचावर मग हमखास धबधबे. घनदाट जंगल, 2100 फुट उंच आणि धबधबे.... अरे हो हेच तर थ्रील आहे आजच्या ट्रेक चे मस्त ना, कॉम्बो थ्रील पॅकेज अजून काय हवंय. चला, अरे चला मित्रांनो आज तुम्हांला मस्त पैकी घनदाट जंगलाची 'अंधार बन' सफर घडवून आणते. तयार ना मग! कोणाची वाट पाहताय उचला बॅगा निघा. थांबा! लगेच कुठे निघालात... पावसाळी भ्रमंती ही योग्य आयोजन नियोजन केल्याशिवाय करू नये,लक्षात ठेवा. निघाले लगेच 😐😐
      आता सर्वांना वेध लागले होते ते 16 जुलै 'अंधार बन' ट्रेक चे,आमचा फोना चा अंधार बन ट्रेक 16 जुलै 2017 ला आयोजित करण्यात आला आणि हा हा म्हणता 100 ट्रेकर्स निश्चित ही झाले. या मध्ये 70, 75 हे न्यू ट्रेकर होते, नेहमीप्रमाणे सर्वांचा एक वॉट्सप ग्रुप करुन वेळोवेळी ट्रेक विषयी सर्व सुचना, माहिती, नियोजन आणि शंकांचे निरसन ग्रुप वर करण्यात आले. रविवार दि. 16 जुलै ला सकाळी 6 वा. दोन बस तळेगाव - निगडी - चांदनी चौक - पिरंगुट - पौड - मुळशी मार्गे सर्वांना घेत घेत ताम्हीणी कडे निघाल्या..... ताम्हीणी घाट, अतिशय सुंदर असा ताम्हीणी घाट पुणे जिल्ह्यांमध्ये मुळशी तालुक्यात ताम्हीणी घाट येतो. पुण्यापासून 70 कि. मी. अंतरावर असलेल्या या ताम्हीणी घाटात पिंपरी या गावी 'अंधारबन' हे घनदाट जंगल आहे. घाटातून जाताना काही ठिकाणी भातलावणी ची लगबग चालू होती. एकतर सकाळ पासून भरुन आलेलं आभाळ, जसजशी बस पुढे जात होती तसतसे हिरवेगार प्रपात समोर येऊ लागले त्यांना अडलेले ढग मधेच पावसाची धार आणि अचानक येणारं धुकं निसर्गाची अनेक रुपं आणि डोंगर रांग वाढतच होती. अप्रतिम शब्द पण कमी पडावां इतका भन्नाट निसर्ग किती पाहू किती डोळ्यात साठवू अशीच काहीशी अवस्था, ट्रेक करा अथवा ना करा पण हा ताम्हीणीचा घाट फिरा रांव! काय अप्रतिम घाट, मागील काही वर्षांत चेरापुंजी पेक्षा अधिक पाऊस ताम्हीणी घाटात झाला.
ताम्हीणी घाट

बस मध्येच नाष्टा करुन पुढे शिवसागर हॉटेल मधे सर्वांनी गरमागरम चहा घेतला. एका ट्रेकर्स ने उत्स्फुर्तपणे शिवगरजना दिली व आम्ही पुढे निघालो. साधारण 11ला आमच्या दोन्ही बस पिंपरी डॅम येथे पोहचल्या. बस मधेच आम्हाला ट्रेक विषयी सुचना देण्यात आल्या आणि सुचना पाळण्याबाबत निक्षून सांगण्यात आले. निसर्गाचा आनंद सर्वांना मनापासून घेता यावा यासाठी सूचनांचे पालन करणे ही तितकेच गरजेचे असते.
तसा आमचा ट्रेक अंधारबन ते भिरा डॅम असा 14 कि. मी. चा होता परंतु भिरा डॅम कडे जाणारा रस्ता बंद केल्याने, अंधारबन ट्रेक निम्म्या पर्यंत करुन परत पिंपरी डॅम कडे येण्याचे ठरले.
फोना ग्रुप

रघुनंदन पाटील यांनी सीड्स बाॅल आणले होते ते सर्वांना वाटण्यात आले हे बाॅल्स प्रत्येक जण ठराविक अंतराने जमिनीत लावत पुढे जात. हे खुप छान वेगळ्या पद्धतीचे वृक्षारोपण करण्यात आले त्यातील 80% तरी नक्कीच रुजतील. पिंपरी तलावाच्या बंधारा वरुन ट्रेक आणि पाऊस दोन्ही सुरु झाले. या तलावात कोणीही जाऊ नये यामध्ये खुप गाळ चिखल आहे.
पिंपरी तलाव फोटो

जंगल ट्रेक मधे नेहमी ग्रुप ग्रुप ने चालावे. अंधारबन नावाप्रमाणेच खरच अंधार आहे या जंगलात दिवसा देखील सूर्यप्रकाश खाली येत नाही इतके घनदाट आहे. इथे जैवविविधता तसेच प्रचंड प्रमाणात औषधी वनस्पती पहायला मिळतात (अर्थात ज्यांना त्या कळतात त्यांनाच). अंधारबनातून चालताना काळजीपूर्वक चालावे लागते एकतर पायवाट अरुंद आणि दुसर्‍या बाजूला खोल कुंडलिका दरी हि वाट कुठे चिखलमय असते तर कुठे पाऊसा मुळे पाणी वाहत असते. या वाटेवर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत आणि एका बाजूला खोल दरी, एकिकडे कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज दुसरीकडे वार्‍याचा अशा वेळी शांत सावध पणे धबधबे पार करावे. इथे सेल्फी चा मोह टाळावा. आम्ही हा भन्नाट थरार अनुभवत पुढे जात होतो.
धबधबा

पावसामुळे बिळातील अनेक जीव बाहेर आलेले असतात अश्या वेळी एखादी काठी हतात असेल तर उत्तमच. चालतांना अजुबाजुला नजर असावी, कोणत्याही झाडाला हात लावू नये कारण बिळातील जीव आता झाडावर आलेले असतात. तसेच अनेक प्रकारचे किटक किडे डास असल्याने शक्यतो ओडोमाॅस वापरावे. या अंधारबनात चालताना मला तर अवतार मुवीच्या त्या घनदाट जंगलाचा भास होत होता,कारण पाऊस थांबला की हळूहळू दाट धुकं जमा होत आणि काही क्षणात समोरचे दिसेनासे होत त्यामुळे एखाद्या हाॅरर मुवीतील भयानक जंगल वाटायचे. तेही किर्ररररर जंगल मस्त एन्जॉय करत पुढे निघालो.
किर्र जंगल

आता आम्हाला तीन मोठे धबधबे पार करायचे होते आणि इथेच सर्वांना 'फोना द ग्रेट टिम' चा अनुभव आला. एके ठिकाणी फोना च्या टिमने हाताची साखळी करुन एक एकाला धबधबा पार करवला. आशा प्रकारे कौशल्य पणाला लावून फोना टिम ने 100 मेंबर्स ना पुढचे दोन धबधबे रोप लावूनच प्रत्येकाला पार करवले. त्यासाठी फोना ग्रुपचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


हे तीन धबधबे पार करून पुढे गेल्यावर समोर जे दृश्य दिसते ते म्हणजे वाव वाव वाव..... अप्रतिम सुरेख चारही बाजूंनी हिरवाई पांघरलेले डोंगर आणि त्यांच्या मागे असलेल्या उंच डोंगरावरुन कोसळणारे धबधबे आणि त्यांना अडलेले ढग अन् मधेच उगवणारं धुकं नजरेत किती सामावून घ्यावे काय ते निसर्गाचे क्षणाक्षणाला बदलत जाणारे रूप मधेच येणारा पाऊस तर कधी अचानक येणारं दाट धुकं तर कधी अंगावरून जाणारे ढग आहाहः स्वर्गच..... स्वर्गच जनू....!!!!!


हिरडी गावाच्या अलिकडे आम्ही सर्वांनी जंगली भोजन उरकले आणि फोना फॅमिली चे ग्रुप फोटो घेतले. राणे सरांनी... अंधार फार झाला... हे गाणे म्हणून सर्वांना उत्साहित केले व इथे मंदार सरांनी अंधारबन बद्दल  माहिती दिली की, हेच ते एकमेव जंगल जिथे मानवी हस्तक्षेप झालेला नाही म्हणून आजही हे अंधारबन घनदाट जैवविविधतेने आणि नैसर्गिकरीत्या टिकून आहे. आपणही निसर्गाला हानी पोहोचवू नये. कुठेही प्लास्टिकचा कचरा करु नका, जंगलात या ट्रेक करा, आनंद घ्या निसर्ग सांभाळा त्याचे सौंदर्य जपा मग तोही आपल्याला कसे भरभरून देतो ते पहा. परत येताना तेच तीन धबधबे पार करायचे पण आता प्रवाहाचा वेग चांगलाच वाढला होता कारण पाण्याचा रंग मातकट झाला होता. जेव्हां प्रवाहातील पाण्याच्या रंगात बदल दिसेल तेव्हां प्रवाहाचा वेग वाढला आहे असे समजावे. आणि वेग कमी होण्याची वाट पहावी. वेग कमी झाल्यावर रोप लावून प्रत्येकाला धबधबा पार करुन घेतला. 100 मेंबर्स ना अशा थ्रीलींग ट्रेक ला घेऊन जाणे व विना अपघात प्रत्येकाला अगदी सुखरुप परत आणणे हे आमच्या फोना द ग्रेट टिम ला सहज शक्य आहे. "फोना है तो क्या खो ना" असा विश्वास प्रत्येकाच्या मनात पक्का झाला. आणि 'फ्रेंड्स आॅफ नेचर... ने तो साध्य करुन दाखवला. फोना चे लिडर मंदार सर, राणे सर, निकाळजे सर, रोहित सरांचे आभार तसेच गोलांडे सर मंगेश सर विनोद सर नितीन सर माजगांवकर काका यांचे विशेष कौतुक 👏 आणि आभार व आलेल्या सर्व ट्रेकर्स चे अभिनंदन व आभार.

ट्रेक साठी तयारी...
रेनकोट, हलके कपडे घालावेत, ग्रीपवाले शुज, मोबाईल प्लास्टिक कव्हर मधे, हवाबंद खाद्यपदार्थ, जादा कपडे, टॉवेल, घेतलेली प्रत्येक वस्तू प्लास्टिक बॅग मध्ये घ्यावी,डोक्यावर प्लास्टिक कॅप, आणि ट्रेकिंग स्टिक.
अशा महत्त्वाच्या गोष्टी ची तयारी केली तर पावसाळी ट्रेक उत्तमरीत्या पार पडतो.
सह्यवेडी सुर 
सुरेखा पवार 🚩 
16 जुलै 2017

Comments

  1. Replies
    1. धन्यावाद सर

      Delete
    2. Atishay Chhan.....Agadi parat trek kartoy asech watate blog was.....
      Bhashashaili tar Khupch awadali........
      Khup dhanyawad.....
      Manoj Rane

      Delete
  2. Every moment you have mentioned, i mean photography exactly explaining the bolg. And last trek preparation point🤘

    ReplyDelete
  3. Excellent! Very beautifully explained....Andharban.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक