कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक


आयुष्यात एकदा तरी कैलास मान सरोवर यात्रा करण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ...आणि येणारा खर्च. कारण ही यात्रा एका दिवसात होणारी तर नाहीच परंतु वेळे अभावी आणि आपल्या इथ पासुन बरीच दूर असल्याने ही यात्रा इच्छा असूनही बर्‍याच जणांना करता येत नाही. पण अशीच एक यात्रा आपल्या सह्याद्रीत ही पूर्ण करता येऊ शकते. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. एका दिवसात कैलास पर्वताची अनुभुती देणारी यात्रा हो तर, शक्य आहे.... मी तुम्हाला आज एका अश्या ठिकाणी घेऊन जाणार आहे की, जिथे बाराही महिने स्वयंभू शिवपिंडीवर सतत थेंब थेंब जलाभिषेक होत असतो आणि ती जागा आहे  साडेतीन हजार फुट उंचीवर असलेल्या डोंगराच्या गुहेत....आहे ना निसर्गाचा अद्भुत चमत्कार तीच ही नागेश्वर गुहा.....



वैशिष्ट्य म्हणजे वासोटा ट्रेक मधील नागेश्वर यात्रा एका दिवसात पूर्ण ही करता येऊ शकते. ... असंख्य भाविक महाशिवरात्रीला अनेक तासाचा पायी खडतर प्रवास करून अत्यंत श्रद्धेने या स्वयंभू शिवालयात दर्शनासाठी येतात.




आता या ट्रेक बद्दल थोडंसं जाणून घेण्यासाठी भूगोलात शिरूया का....
सह्याद्रीतल्या उत्तुंग शिखराच्या रांगेमध्ये हा ट्रेक येतो आणि या उत्तुंग शिखरां मध्ये येते ती महाबळेश्वर डोंगररांग. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली असून या रांगेला समांतर जाणारी दाते गडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर पासून दाते गडा पर्यंत जाते आणि या दोन रांगांच्या मधून कोयना नदी वाहते.

कोयना... जिच्यावर अर्धा महाराष्ट्र प्रकाशमान झाला तीच ही कोयना जलदायनी.
हेळवाक येथे या कोयना नदीवर धरण बांधण्यात आले असून याच धरणाच्या अथांग विस्तारला 'शिवसागर' जलाशय असे म्हणतात.
 याच शिव सागराचे पाणी वासोटा पायथा तसेच तापोळा पर्यंत पसरलेले आहे.

दक्षिणोत्तर सरळसोट सह्याद्री आणि कोयनेचं खोरं, तर पूर्वेला जावळीचं घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग सुळके, यामुळे किल्ल्याच्या दुर्गमतेत अधिकच भर पडते. अशा या लाभलेल्या दुर्गमते मुळेच या भागातील वन्यजीवन अधिक समृद्ध झाले आहे. अश्या या सुंदर कोयना नदीच्या खोर्‍यात प्रचंड वृक्षराजीने नटलेल्या घनदाट अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजेच कोयनेचा वाघ... 'वासोटा' यालाच व्याघ्रगड असेही म्हणतात. कारण या भागात पूर्वी पासून वाघांचा ठिकाणा आहे. सध्या हातच्या बोटावर मोजण्याइतकेच वाघ आहेत. शिवाजी महाराज या किल्ल्याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी करीत असत.

4267 फुट उंचीवर असलेल्या वासोट्याची निबिड जंगलातील थरारक चढाई आजच्या तरुणाईचा आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशभरातील ट्रेकर्सना भुरळ घातली आहे या वासोटा ट्रेकने.
STF सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन पुणे....  या ट्रेक ची लिंक  ग्रुप वर आली आणि चार तासात 185 मेंबर्स चे बूकिंग झाले देखील. शेवटी बूकिंग वाढत चालल्यामुळे 250 मेंबर्स नंतर लिंक बंद करावी लागली. STF महाराष्ट्रातील अशी एकमेव संस्था आहे जी ट्रेकिंग साठी अत्यंत माफक दर आकारते... ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी ही संस्था आहे.
20 फेब्रुवारी गुरुवारी रात्री 12 च्या पुढे आमच्या पाच बस  पुणे सोडून सातारा च्या दिशेने... पुणे बंगलोर हाय वे वरून धावू लागल्या आणि पहाटे पहाटे शेंबाडी या गावी पोहोचल्या. या इथे असलेल्या मठाच्या प्रांगणात आमच्या टीमने सर्वासाठी महाशिवरात्र असल्याने साबुदाणा खिचडी कोशिंबीर, चहा असा नाष्टा बनवला होता. सर्वानी सकाळची कार्य आटोपून वेळेत नाश्ता करून पटापट आवरून डॉट साडेसहाला... टीम लिडर च्या सूचना ऐकण्यासाठी एकत्र आले .

सह्याद्री ट्रेकिंग फाऊंडेशन.  पुणे... आमचे ट्रेक लीडर .. सुरेंद्र भाऊ

इथे टीम लीडर सुरेंद्र भाऊंनी सर्वांना ट्रेक बद्दल माहिती, सूचना दिल्या व शिस्तीचे पालन करावयास सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण माहिती व सूचना ऐकून बोटी कडे निघाले.....हो बोटीकडे कारण या ट्रेक मध्ये किल्ल्याचा पायथ्या गाठण्यासाठी आधी बोटीने प्रवास करावा लागतो.

पूर्वेकडे आकाशात लाल केशरी रंगाची उधळण करीत डोंगरा अडून हळूच डोकावू लागलेला सूर्योदय, आणि इथे लाल मातीच्या किनार्‍यावर लागलेल्या बोटी आणि त्यावर फडफडनारे भगवे, समोर अथांग पसरलेला शिव सागर आणि त्यावर पसरत गेलेली सकाळच्या धुक्याची चादर आणि त्याच्या दोन्ही बाजूने वेढलेले गर्द हिरवे पण सध्या धुक्यात हरवलेले डोंगर अतिशय सुंदर अशी मन प्रफुल्लित करणारी स्वतः च्याच एक एक छटा दाखवणारी सभोवतालची सृष्टी. व्वा क्या बात है!

वासोटा कडे जाण्यासाठी  आपल्याला बामनोली वरून ही जाता येते. सातारा वरून बामनोली 50 km वर आहे. आम्ही शेंबाडी वरून जाणार आहोत कारण इथून बोटिंगला एक तास लागतो व गर्दी नसते. एक एक करत आमच्या सात ते आठ बोटी निघाल्या. शेवटच्या बोट मध्ये आम्ही 27 जण आणि निघता निघता नेमकी आमचीच बोट बंद पडायची होती, बाकीच्या बोट पुढे निघून गेल्या झालं आता आम्हाला उशीर होणार हे नक्की आणि झालं तसचं. आमची बोट आठ वाजता निघाली.....

नारायणाने पुर्णपणे दर्शन दिल्याने धुक्याची चादर आता हळू हळू विरळ होऊ लागली तसं आजूबाजूच्या ये हसी वादीयां त्यांचं मनोहारी रूप प्रकट करू लागल्या. शिवसागर जलाशयातील बोट राईड मला केरळ च्या पेरियार लेकची आठवण करून देऊ लागली. ये नीला खुला आस्मा, और ये बोट राईड दिल खुश हो गया.  हलक्याश्या हिरवट दिसणार्‍या धरणातील पाणी कापत जाणार्‍या बोटीमुळे उठणारे तरंग अधिकच सुरेख दिसू लागले.

जसं जशी बोट पुढे जात होती तशी कोयनेची भव्यता आता आमच्या नजरेत येऊ लागली. पाण्यानी वेढलेले हिरवे गर्द डोंगर जसे काही आमच्या स्वागताला उभे आहेत असे वाटू लागले.
एक तासभर हे विलोभनीय दृश्य न्याहाळत आम्ही मेट इंदवली या गावी पोहचलो हे गांव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे . या ट्रेक मध्ये पदभ्रमंती बरोबर नो ऑप्शन बोट सफरीचा मिळणारा आनंद काही औरच. या आनंदातच आम्ही किनार्‍याला उतरलो.
इथूनच आपला ट्रेक सुरु होतो. थोडे पुढे गेल्यावर वनरक्षक खात्याचे ऑफिस लागते इथे वन संरक्षणासाठी प्रत्येकी पन्नास रुपये चार्ज आकारला जातो, पण महाशिवरात्रीला कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही. तुमच्या बॅग ची तपासणी केली जाते कोणताही ज्वलनशील पदार्थ घेऊन जात नाही ना याची खात्री केली जाते, पाण्याच्या बाटल्या मोजल्या जातात आणि परत आल्यावर एकदा बाटल्या मोजल्या जातात कमी असल्यास आपल्याकडून दंड घेतला जातो. असे कडक नियम प्रत्येक ट्रेकिंग मध्ये असायला हवेत त्यामुळे मनुष्य प्राण्याला शिस्त लागेल आणि जंगलातले प्राणी सुरक्षित राहतील. तसेच कुठेही प्लॅस्टिक कचरा होणार नाही. इथून पुढे गेले की सह्याद्री व्याघ्र राखीव अशी कमान लागते.

या कमानीतून 15 मिनिट अंतरावर छोटेखानी हनुमानाचे मंदिर लागते.
या मंदिरा पासून आपल्याला दोन वाटा लागतात डाव्या हाताची वाट  वासोट्या वर घेऊन जाते तर उजव्या हाताची सरळ नागेश्वर कडे घेऊन जाते. आपण कोणतीही वाट निवडू शकतो. वासोट्या कडून नागेश्वर किंवा नागेश्वर कडून वासोट्या कडे, खाली दिलेल्या माहितीनुसार आपण ठरवू शकतो.
आम्ही ट्रेकमेट म्हणजे मी, डॉ अश्विनी, स्मिता, राहुल आणि आनंद .... राहुल च्या मार्गदर्शनाखाली नागेश्वर कडून वासोट्या वर जायचे ठरले.
माझी गँग


म्हणुन आम्ही उजव्या हाताची वाट धरली. ही पूर्ण वाट अक्षरशः कोयनेला मिळणार्‍या कोरड्या पडलेल्या पत्रातून जाते.

पात्राच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि घनदाट जंगल. नदीच्या कोरड्या पत्रातून चालणे म्हणजे कठीण चाल, कारण यात असणारे रंगीत लहान मोठे गोल गुळगुळीत झालेले गोटे तर कुठे खडबडीत मोठाले सर्वत्र विखुरलेले खडक पार करणं म्हणजे दिव्यच! जे नदी पात्र डोंगराचा उतार होऊन धावत खाली आले होते तेच पात्र आम्ही खालून वर चढत होतो. त्यामुळे दमछाक नाही झाली तर नवलच! ऊन अजून तरी तसे लागत नसल्याने म्हणुन बरे चालले होते. प्रत्येक दगड धोंड्या वर पाय ठेवत एकीकडे हातातल्या काठीचा आधार घेत तर कुठे मोठ मोठ्या खडकांना वळसा घालून वाट काढत ते नदी पात्र वरच्या दिशेने चढत होतो. आज महाशिवरात्र असल्याने या वाटेवर नागेश्वर ला जाणारे बरेच गावकरी दिसत होते. काही जण तर अनवाणी चालत होते त्यांच्या चाली वरून त्यांच्यातला काटकपणा अगदी स्पष्ट दिसत होता.

नाहीतर एक आम्ही इतके चांगले ट्रेकिंग शूज घालून सुद्धा कितीतरी वेळा तोल सांभाळत स्वतःला सावरत ते नदी पात्र पार करत होतो.
काही काही ठिकाणी इतके नितळ पाणी होते की, तळाचे गुळगुळीत गोटे अगदी स्पष्ट दिसत. खालच्या फोटो वरुन ते लक्षात येईल च किती स्वच्छ पाणी आहे ते...


ही नदी पत्रातली चढण चांगलाच घाम काढत होती त्यामुळे ह्या नदी पत्रातल्या किती तरी दगडांवर घामाचा जलाभिषेक चालूच होता. जिथे मिळेल तिथे मधेच पत्रातील थंडगार पाणी तोंडावर मारून आलेला थकवा दूर करत होतो. चढाई जशी कठीण होऊ लागली तसे ऊनही चांगलेच तापू लागले. साधारण दीड तासानंतर नदी पत्राचा भाग संपत आला व थोडी कठीण चढण सुरू झाली. इथून नागेश्वर चा फणा दिसू लागला. जस जसे वर येऊ लागलो तस तशी झाडी कमी होऊ लागली. हा शेवटचा टप्पा थोडा चढा आहे. पुढे थोड्या अंतरावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते इथले पाणी पिण्यासाठी घेऊ शकतो.

या विहिरी पासून मोजून दहा मिनिटातच आम्ही नागेश्वर च्या पायर्‍या जवळ पोहचलो. पण ही प्रचंड रांग असल्याने आम्ही तिथला आजूबाजूचा निसर्ग पाहून घेतला व आमच्या बाकी मेंबर्स ची वाट पाहत तिथेच थांबलो.


फुल नाही तर फुलाची पाकळी... कैलास पर्वत नाही निदान नागेश्वर थोडक्यात कैलास पर्वताची अनुभुती देणारी यात्राच... कारण चार हजार फुट उंचीवर च्या डोंगराच्या कड्यात असलेल्या गुहेत निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी, काही लोकं (भाविक) इकडून कोयना खोर्‍यातून तर काही vasota मार्गे, तर काही कोकणातून सात ते आठ तासची अति कठीण चढण चढून इथवर येतात. असा हा खडतर प्रवास करून बाराही महिने सतत जलाभिषेक होणार्‍या स्वयंभू शिव पिंडीवर नतमस्तक होतात.

नागेश्वर कडून डोंगर धारेची वाट वासोट्या कडे घेऊन जाते. इथून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी किमान दीड तास लागतो.

या डोंगर धारे वरून दूरवर वासोटा खूपच छान दिसत होता. या वाटेवरून जाताना उजव्या हाताला कोकणात खाली उतरणारे अनेक बेलाग कडे उरात धडकी भरवतात.

ही पायवाट अरुंद असल्याने अगदीच दरीच्या कडेकडेने जाते. काही काही ठिकाणी  अगदीच निमुळती वळणे असल्याने उगाचच मनाचा थरकाप उडवतात. चुका ध्यान तो गयी जान याची प्रचिती इथे आल्या शिवाय राहत नाही. किमान तासभर तरी हा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो.

 ट्रेक सुरु झाल्यापासून इथपर्यंत एक लिटर electral, संत्र, सफरचंद, लिंबू पाणी, साधं पाणी यांनी खूप छान सांभाळून घेतल्यामुळे थकवा कुठच्या कुठे पळून जात होता. पुढे जंगलातून वाट सुरु झाली आणि छान सावली सुरू झाली.  दोन तास उन्हातून चालत असल्यामुळे जंगलातली शीतलता अधिकच जाणवली. अतिशय सुंदर आणि घनदाट जंगलातून अनेकविध पक्षांचा किलबिलाट चिवचिवाट आणि खूप सुमधूर आवाज ऐकु येऊ लागले. वासोटा दुर्गम असल्याने इथे जैव विविधता पाहायला मिळते. इथल्या दुर्गम ते मुळेच इथले वन्यजीवन अधिक समृद्ध झाले आहे. या वासोट्या वरून जुन्या वासोट्या कडे जाणारा मार्ग बंद आहे कारण मानवी हस्तक्षेप नसले तर तेथील वन्यजीवन अधिक सुरक्षित राहील, यात शंका नाही.

या घनदाट अरण्यात हिंस्र श्वापदे.. वाघ बिबट्या तसेच अस्वल, गवा, रानडुक्कर, असे अनेकविध प्राणी आहेत. तुम्ही म्हणाल, अरे बापरे इतके प्राणी आहेत तर ट्रेक कसा होणार... पण काळजी नसावी कोणत्याही जंगलात दिवसा एकदा का माणसांची भ्रमंती सुरू झाली की, त्या वाटेवर कोणतेही प्राणी फिरकत नाहीत. त्यामुळे इथे संध्याकाळी चार पर्यंत पायथा गाठण्याची सक्त ताकीद देण्यात येते.

साधारण तासभर जंगल भ्रमंती नंतर ऐका ठिकाणाहून उजव्या बाजूने झाडीतून एक वाट तीस मिनिटात किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आमच्याकडील उपलब्ध पाणी साठा संपत आल्याने आम्ही माथ्यावर जाण्याचे टाळले आणि त्यामुळे माथ्यावरून दिसणारा विहंगम नजारा पाहू शकलो नाही. मग इथेच थोडावेळ थांबून एकमेकांचा खाऊ फस्त केला. त्यामुळे सर्वांचे पोटोबा शांत झाले होते.



आता घाई करून लगोलग वासोटा उतरण्यास सुरुवात केली. इथून पायथा गाठायला किमान दीड तास लागतो. ही जंगलातली उतरण उतरतानाच लक्षात येऊ लागले की चढण किती दमवणारी असेल. जावळीची बिकटता आणि अजिंक्य असा हा मुलूख या ठिकाणी आल्यावर लक्षात येते. लहानपणी इतिहासात वाचलेली जावळीची महती आज प्रत्यक्षात अनुभवताना खरंच भारी वाटत होतं. या जावळी च्या खोऱ्यातील विविध घाटवाटा तुडवल्यानंतर ती अधिकच आवडू लागली. किल्ला उतरताना ठीक ठिकाणी बर्‍याच कोरलेल्या पायर्‍या लागतात.

दोन्ही बाजूने उंचच उंच गेलेले वृक्ष, अफाट विविध प्रकारची झाडी झुडपे. त्यामुळे जंगलात सूर्यकिरणांना नो एंट्री असे हे सुंदर जंगल. हे इतकं भारी जंगल वैभव पाहत पाहत कधी पायथा आला गाठला समजले पण नाही, अशी जादू करतात आपल्यावर ही जंगलं की अगदी त्यात हरवुन जायला होतं.


सकाळी ज्या हनुमान मंदिर पासून उजवीकडून सुरुवात करून नागेश्वर गाठला, आणि नागेश्वर करून वासोटा केला आणि तिथून परत वासोटा उतरून खाली याच हनुमान मंदिरपाशी जवळ जवळ साडेपाच तासांनी पोहचलो.
साधारण असा होता ट्रेक

इथून कोरलेल्या पायवाटे वरून पंधरा मिनटात बोटी जवळ पोहचलो. आता सुरू झाला परतीचा प्रवास. तो अथांग जलाशय मागे टाकत आमची बोट पाणी कापत पुढे निघाली, कोयनेच्या वाघाला परत येण्याचं आश्वासन देऊन परत एकदा मनभरून पाहून घेतलं. आजूबाजूचं सुंदर घनदाट पसरलेलं जंगल आणि त्यातून वर निघालेले उंच उंच सुरेख डोंगर पाहत बोटीतून पाण्याची आणि भोवतालच्या वातावरणाची मजा घेत घेत आम्ही त्रिवेणी संगमला पोहचलो. इथे त्रिवेणी संगमवर  मसाला चहा घेत घेत सुंदर सूर्यास्त अनुभवला.


आता आमच्या पाचही बस सातारा च्या दिशेने निघाल्या, साताऱ्यात अमोल जोशी दरवर्षी महाशिवरात्रीला या ग्रुपसाठी महाशिव थाळी चे आयोजन करतात. ही उपवासाची थाळी अतिशय उत्कृष्ट होती. सर्व पदार्थ अप्रतिम झाले होते. या छान थाळीचा सर्वानी आस्वाद घेतला.  ग्रुप मधील एका ट्रेकर्स चा वाढदिवस साजरा करून सर्वानी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या व ट्रेक लीडरने नेहमी प्रमाणे ग्रुप मधील सर्वात लहान ट्रेकर्स वय वर्षे 4 आणि सर्वात वयस्क ट्रेकर्स वय वर्षे 79 यांचे तोंडभरून कौतुक केले.

 आम्हा सर्व ट्रेकर्स चे आभार मानून सर्वांना पुढच्या ट्रेक च्या शुभेच्छा दिल्या. आम्ही रात्री 10 वाजता सातारातून पुण्याकडे मार्गस्थ झालो. रात्री साडेबाराला आम्ही पुण्यात पोहचलो. डॉ अश्विनीची गाडी असल्याने आम्हाला इतक्या रात्री उशिरा घरी जायचे टेंशन नव्हते. तिच्यामुळे आम्ही रात्री दीड वाजता सुखरूप घरी पोहचलो.
सह्याद्री ट्रेकिंग फाऊंडेशन पुणे यांच्या बरोबर प्रत्येक ट्रेकरला भुरळ पडणारा वासोट्याचा थरार अनुभवायला मिळाला त्यासाठी STF चे व आलेल्या सर्व ट्रेकर्स मित्र मैत्रिणीचे तसेच माझे ट्रेकभिडू अश्विनी, राहुल, स्मिता वैशाली, आनंद तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. 🚩 🚩 🚩 🚩
ट्रेक मधील एक स्वछंद पणे बासरी वर सुंदर स्वर काढणारा अवलिया.....
यशवंत साळुंखे .. 

कायम आठवणीत राहील अशी... Everest वीर Bhagwan Chavale यांची ग्रेटभेट....


फोटो सौजन्य.... Bapu Zurange, Ganesh Agashe.
                    या ट्रेक चा पूर्ण video खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता
https://youtu.be/9fYqDasoe20
साह्यवेडी सूर 🚩
सुरेखा पवार
8208947409



















Comments

  1. खूप सुदंर ब्लॉग लिहिला आहे तुम्ही...

    ReplyDelete
  2. फार सुंदर, सविस्तर वर्णन

    ReplyDelete
  3. खुप छान लिहीलय!

    ReplyDelete
  4. Khoop chan, savistar varnan. Aamhi mitra aalo hoto ya group barobar 7-8 varshapurvi. Shivrati la. Aathavani punha tajya zalya..


    ReplyDelete
  5. Khupch chan....👍👍👍

    ReplyDelete
  6. खूपच छान.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक