ढवळे ते आर्थर सीट ट्रेक.... 🚩


जावळी च्या खोर्‍यातील एक हटके घाट वाट ..  

ढवळे ते आर्थर सीट ट्रेक 🚩 9 फेब्रुवारी 2020


आठ तासाच्या पायपीट नंतर खालून एक नजर वर आर्थर सीट कडे टाकली, तर ही माणसांची गर्दी त्या गर्दीला पाहून त्यांची थोडी कीव आली. मानत आले 'अरे बाबानो इथून जो नजरा बघताय त्याच्या कितीतरी पट मोहक सौंदर्य, खरं वैभव तर या जावळी च्या खोर्‍यात दडलेलं आहे' आणि ते तुमच्या समोर हाथ पसरून उभं आहे रे...
आता काही मिनिटातच मी आर्थर सीट वर आणि याच्यावरून कित्येकदा पाहिलेला नजारा आज परत एकदा पाहताना अगदी  कृत्य कृत्य झाले होते.

या  पॉईंट वरून दिसणारा मोहक नजारा जर आर्थर ला वेड लावत असेल तर विचार करा, इथपर्यंत घेऊन येणार्‍या दर्‍याखोर्‍यातल्या घनदाट अरण्यातील सुंदर अश्या घाटवाटा आपल्याला अनुभवायला मिळाल्या तर किती वेडं करतील हो ना...!


आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं गौरवस्थान म्हणजे आपला सह्याद्री, याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. राकट रांगडा कणखर दिमाखदार असा हा सह्याद्री म्हणजेच आपला पाश्चिम घाट, देशावरून (घाटावरून) कोकणात उतरणार्‍या आणि कोकणातून देशावर जाणार्‍या वाटा म्हणजेच घाटवाटा.  मी STF ग्रुप बरोबरचे जसे ट्रेक करत गेले तश्या या घाट वाटा मला समजू लागल्या. ग्रुप वर जशी या ट्रेक ची लिंक ओपन झाली तशी एका दिवसात बंद पण झाली कारण बूकिंग लगेच फुल्ल झाले. कारण ग्रुप ची खासियत आहे तशी आणि हटके ट्रेक 🚩
शुक्रवारी रात्री 12 ला आम्ही पुणे सोडले. भोर मार्गे वरंधा घाटातून... महड पोलाद पूर ते ढवळे गांव असा साडेचार तासाचा प्रवास, पहाटे पावणेपाचला ढवळे गांवात पोहचलो. थंडी बिलकूल नव्हती पण वारे वाहत होते. पोर्णिमा असल्याने चंद्रप्रकाशात गांव फार छान दिसत होतं. गावांत महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे इथे मुक्काम करता येऊ शकतो. पावसाळ्यात या गावाच्या जवळचा मोर झोत धबधबा पाहण्यासारखा आहे म्हणे.

लगोलग सगळे आपापल्या परीने फ्रेश होऊन कोणी मसाले दूध तर कोणी गरम चहा टोस्ट खाऊन एकदम ताजेतवाने झाले. सगळ्यानी भराभर आवराआवरी करून आपापल्या ट्रेकिंग गेट अप मध्ये तयार होऊन आले. तिथेच ट्रेक बद्दल भाऊने (म्हणजे आमचे ट्रेक लीडर) सर्वांना ट्रेक बद्दल आवश्यक सूचना व माहिती दिली. वारे ही चांगलेच वाहत होते. सकाळी साडेसहाला ढवळे गावातून ट्रेक सुरु झाला, सकाळी सकाळी शक्य तेवढा लवकर सुरु झालेला ट्रेक मला खूप आवडतो, कारण ते वातावरणच असतं तसं एकीकडे अस्ताला चाललेला चन्द्र आणि सूर्योदयापूर्वी उजळून निघालेला आसमंत वाह तुमच्या डोळ्या समोर आला ही असेल, म्हणुन मला सकाळची लवकर झालेली ट्रेकची सुरवात नेहमी आवडते. 


या ट्रेक ची वाट फारशी वापरात नसल्याने भाऊंनी या गावातून एक गाईड बरोबर घेतला. थोड्याच वेळात गावाबाहेर एक वस्ती लागली, तिथे ग्रुप ने आणलेल्या कपड्यांचे वाटप करून ग्रुप पुढे मार्गस्थ झाला.



 पुढे शेतातून झाडीतून वाटचाल करीत काही वेळातच एका वळणार चंद्रगडाने आम्हाला दर्शन दिले, अजून सूर्य नारायणाने पण आम्हाला दर्शन दिले नव्हते. चन्द्रगड व त्याच्या आजूबाजूचे सकाळच्या बारीकश्या धुक्यात हरवलेले डोंगर आणि वर आकाशात एकत्र आलेले हलकेसे ढग आणि त्यामुळे तयार झालेलं भोवतालचं वातावरण एकदम मस्त दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं. 
इथे फोटो काढले नाही तर नवलच!

इथे दोन वाटा फुटतात एक उजव्या बाजूची वाट चन्द्रगडावर जाते व डाव्या बाजूची वाट चंद्र गडाला वळसा घालून पुढे ढवळे घाटाच्या दिशेने वर जाते. आम्हाला चन्द्र गड करायचा नसल्याने आम्ही डाव्या वाटेने निघालो. प्राचीन काळी कोकणातून निघालेला माल याच घाट मार्गाने घाट माथ्यावर जात असे त्यापैकी वरांधा घाट (महाड ते भोर) व आंबे नळी घाट (पोलाद पूर ते महाबळेश्वर) या घाट मार्गावर पक्के रस्ते बनवून या घाट वाटा आजही आपण वापरतो आहोत. त्या काळी घाट मार्गांचे रक्षण करण्यासाठी व दळणवळणा वर लक्ष ठेवण्यासाठी अश्या घाट माथ्यावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले उभारले जात. घाट मार्गाचे रक्षण करण्यासाठी चन्द्रगड, कावळा, मंगळगड, प्रतापगड, हे किल्ले बांधले गेले. तसेच घाटमाथ्यावर कमळगड, केंजळगड,... असे किती तरी किल्ले उभारण्यात आले. 
कोकणातून थेट आर्थर सीट कडे घेऊन जाणारी बर्‍यापैकी अवघड चढण आणि फारशी वापरात नसलेली ही ढवळे घाटातील पायवाट पुर्णपणे जावळी च्या घनदाट अरण्याने वेढलेली आहे.
चंद्र राव मोरे ची जा व ळी सर्वांनाच परिचित आहे. याच जावली च्या घनदाट भयावह अरण्यात शिवाजी महाराजांनी अफझल खाना चे प्राण कंठाशी आणले होते आणि पुढचा इतिहास तर सर्वांना तोंडपाठ आहे. हे अरण्य इतकं दाट आहे की ते संपल्यावरच लक्षात येते की सूर्य उगवला आहे म्हणजेच बाहेर ऊन पडलेलं दिसतं. अरण्यात एका सूर्य किरणांना ही माघार घ्यावी लागते इतके घनदाट जंगल आहे. 


ढवळा घाट पुर्णपणे चढ्या आहे कुठेही सपाटी अशी लागत नाही. दमट हवा आणि लगेच चढाई त्यामुळे पंधरा मिनिटातच चढण दमणूक करू लागली. मध्ये मध्ये थोडी थोडी उसंत घेत जो तो आपापल्या परीने चढणे चालू ठेऊन आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. 

आता घनदाट जंगलातले वैभव दिसू लागलं, प्रचंड वृक्ष, उंच उंच वाढलेल्या वेली, आणि खाली पडलेला पाला पाचोळा... काही काही अजस्र वृक्ष तर एका दृष्टीक्षेपात सुद्धा यायची नाहीत. कधी कधी वाटेतलं एखादं झाड उगाचच भयानक वाटायच. 





पण पक्ष्यांच्या मंजुळ आवाजाने खूप छान वाटायचे पण पक्षी काही नजरेस पडत नव्हते, जंगलातली ही जैव विविधता पहायला मिळत होती. झाडांचा तितका अभ्यास नसल्याने नेमकी कोणत्या कोणत्या प्रकारची झाडे आहेत ते समजायचं नाही.


सारखी चढण आणि दमट हवा यामुळे दर पंधरा वीस मिनिटांनी पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायचो, अश्यावेळी सतत घाम निघत असल्याने पाणी पीत रहावं. तीन तास सतत दमदार चढाई करून गेल्या नंतर ऐके ठिकाणी भल्या मोठ्या दगड धोंड्यानी खचाखच भरलेला कोरडा ओढा लागतो. भरपूर दमलेले आणि घामाने निथळनारे आम्ही सर्वांनी या ओढ्यातच ब्रेक घ्यायचा ठरवलं. इथे पुढे आलेले ग्रुप चे सदस्य बसलेलेच होते. इथे सर्वांनी गरमागरम सूप घेतले. थकलेल्या जिवाला गरम सूप सुद्धा अमृता समान वाटले. सूप पान झाल्यानंतर लगेचच पुढची वाटचाल सुरू झाली.


इथून पुढे दोन तासावर बहिरीची घुमटी लागते म्हणे, तिथे जेवणाचा ब्रेक घ्यायचं ठरलं. या भल्या मोठ्या दगड धोंड्यातून आम्ही चढू लागलो. साधारण तासाभरात ओढ्याला आडवी जाणारी वाट लागली. 


दरीच्या कडेकडेने जंगलातून जाणारी ही वाट.
काही ठिकाणी तर वीतभर जागा अगदी एक पाऊल बसेल इतकीच बाजूलाच फॉल, अश्या ठिकाणाहून अगदी स्वतः ला सांभाळून सावकाशपणे पुढे जायचं असतं. ढवळे घाटातल्या ह्या सततच्या चढाई मुळे अक्षरशः आमची वाट लागत होती आणि दमट हवा आम्हाला आतून बाहेरून पिळून काढत होती. खरंच आपल्या शारीरिक क्षमतेचा किस पडतो,समाधान इतकंच की ऊन अजिबात लागत नव्हतं.
पुढे न संपणारी चढण एका खिंडी सारख्या भागात येते. इथून आपल्याला पलीकडे पसरलेल्या प्रचंड दर्‍याखोर्‍या दिसू लागतात. दूरवर असलेला प्रतापगड, मधुमकरंद गड दिसतो. इथून मागे दरी च्या पलिकडे दूरवर चन्द्रगड अगदी छान दिसत होता. 


मागचा एवढा मोठा प्रचंड पसारा पाहून खरेच वाटेना की याच चन्द्रगडाला वळसा घालून आम्ही इथपर्यंत चढून आलो होतो. खऱ्या अर्थाने जावळीचं खोरं आता आमच्या समोर पुर्णपणे उलगडलं होतं. चढाई बर्‍यापैकी सौम्य झाली होती पण पुढे अजून खडतर चढण बाकी होती. आता समतल वाट होती पण पुढे मात्र अरुंद घसारा च्या धोकादायक वाटेने जाताना कित्येकांच्या पोटात गोळा आला असणारे, तरी पुढे चालणे भागच होते. मध्येच असलेला थोडासा रॉक पॅच पण कमालीचा थरारक वाटला.


काही वेळातच आम्ही थोड्याशा दिसणार्‍या सपाटीला आलो. हीच ती बहिरीची घुमटी. पाच तासाच्या दमदार चढाई नंतर आम्ही घुमटी गाठली होती. ग्रुपचे बरेच मेंबर्स इथे लवकर आल्याने त्यांची जेवणं होत आलेली.
घुमटी नावालाच आहे, एका मोठ्या दगडा खाली छोट्या छोट्या दगडात कोरलेल्या वन देवता आहेत.


 इथून आपल्याला कोळेश्वर पाठार चा डोंगर दिसतो. या बहिरी च्या घुमटीत आपण रायगड जिल्ह्यातून सातारा जिल्ह्य़ात येतो. सकाळ पासुन चालून चालून शरीरातल्या एनर्जीचा कोठा संपल्यामुळे पोटातले कावळे काव काव करू लागले, आम्ही इथेच बरोबर आणलेले एकमेकांचे डब्बे फस्त केले. त्यामुळे पोटाला लई मोठा आधार मिळाला होता.


आता इथून आर्थर सीट फक्त दोन ते तीन तासावर
घुमटी वरून तीन वाटा फुटतात एक आम्ही चढून आलेलो उजव्या हाताची ढवळे घाट, डाव्या हाताला जोर गावात उतरते आणि समोरची आर्थर सीट कडे म्हणजेच आमच्या लक्षाकडे. जेवण संपवून आम्ही आमच्या लक्ष्याच्या दिशेने निघालो. इथेच थोडे पुढे गेल्यावर वाटेत पाण्याचे टाके लागते. 


या पूर्ण ट्रेक मधे हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे स्वतः जवळ मुबलक पाणी बाळगणे आवश्यक आहे.
इथून पुढे 25 मिनिटे घसरड चढाई केली की अचानक एक सपाटी लागते. याला गाढवाचा माळ म्हणतात. बहुतेक त्याकाळी आर्थर पॉईंट वरुन गाढवं इथे चरायला येत असावीत किंवा मालवाहतूकी साठी त्यांचा वापर करीत असावीत म्हणुन की काय याला गाढवाचा माळ म्हणत असावीत, जे काय असेल ते, पण आर्थर वरून पाहणार्‍या मंडळी ना आम्ही नक्कीच माळरानावरचे
गाढव वाटले असू!


या डोंगरधारेवरच्या वाटेवरून खाली सावित्री नदीचे
खोरं दिसतं. सावित्री नदी महाबळेश्वरला उगम पावते, पुढे महाड मधून वाहत जाते. थोडे अंतर चालून गेल्यानंतर इथून आर्थर चा उंच आडवा पसरत गेलेला डोंगर दिसला आणि सगळेच एकदम आनंदून गेलो. तरीही अजून तासभराची पायपीट बाकी होतीच. इथून एल्फिन्स्टन पॉईंट चा परिसर दिसतो, उजव्या बाजूला खडकांच्या थरांनी बनलेले महाबळेश्वरचे पाठार दिसते.



काही वेळातच आम्ही बर्‍याच मोठ्या सपाटीला आलो. घुमटी च्या पुढे जंगल विरळ होत गेल्याने ऊन चांगलाच लागत होतं आणि त्याचबरोबर हवेतला थंडवा ही जाणवत होता. जेंव्हा जेंव्हा वाट दरीच्या काठा काठाने जायची तेंव्हा तेंव्हा दरीत उतरलेल्या डोंगरसोंडा, सर्वत्र पसरलेल्या डोंगर रांगेतले कातळकडे, आणि खाली पसरलेलं घनदाट जंगल अतिशय मोहक सुंदर दिसत होते. किती पाहू आणि किती नको असे झालेलं, कॅमेरा परत परत तिकडेच वळायचा.


परत 20 मिनिट घसारा असलेली चढण चढून जायचे होते. गेले सात तासाची चढण चढून चढून पायांनी बंड पुकारलं होतं. म्हणुन स्वतः लाच समजावत ती घसारा असलेली चढण पार केली, मनात म्हंटलं अजून थोडच मग आपण आपलं लक्ष्य गाठणार आणि पुढ्यात दहा पंधरा फुटाचा रॉक पॅच



झालं हा एक रॉक पॅच की पुढे पंधरा मिनटात आर्थर सीट.
या रॉक पॅच वर आमच्या ग्रुपचे दोन ट्रेकर्स दोर लावुन सगळ्याना वर येण्या करिता मदत करत होते. 90% ट्रेकर्स आर्थरला कधीच पोहोचली होती. आम्ही तो रॉक पॅच अगदी मस्तपैकी पार केला.
या रॉक पॅच च्या समोरच्या दगडात मोठी खोबण आहे, याला विंडो पॉईंट म्हणतात.
आर्थर सीट हा ट्रेक सह्याद्रीतल्या अति कठीण समजल्या जाणाऱ्या ट्रेक पैकी एक आहे. तरीही आपण 4700 फुट उंच महाबळेश्वर पर्यंत चढून जातो . म्हणुन हा ट्रेक पूर्ण पणे आपल्या शारीरिक व मानसिक कसोटी लावणारा ठरतो.
 शेवटचे ट्रेकर्स येईपर्यंत आम्ही इथे थोडीशी फोटोग्राफी केली. इथून समोरचे दृश्य न्याहाळताना...


आता आम्ही उरलेले आठ ट्रेकर्स डाव्या हाताने पुढे निघालो. इथपर्यंत आम्हाला आर्थर सीट वर उभी असलेल्या मंडळीचा कोलाहल ऐकू येऊ लागला. बरोबर दुपारी दोन वाजता आम्ही शेवटचे मेंबर्स आर्थर सीट ला पोहचलो. सकाळी साडेसहा ला चालू केलेला ट्रेक दुपारी दोन वाजता संपला. साडेसात तासाची अवघड चढाई पार केल्याच्या आनंदात आम्ही अक्षरशः न्हाऊन निघालो. 


इथून पाचच मिनिटात आर्थर सीट कडे जाता येते. आम्ही लगेचच आर्थर सीट कडे निघालो, या ठिकाणी असलेली चकाचक मेकअप केलेली टकाटक कपड्यातली पर्यटक मंडळी आमच्याकडे जरा विचित्र नजरेने बघतायत अस आम्हाला जाणवू लागलं. काय करणार आमचा अवतार होताच तसा हातात जंगला तून घेतलेल्या काठ्या, घामाने निथळून अर्धवट वाळलेले टी- शर्ट, धुळीने माखलेल्या ट्रेक पँट, आणि त्याहूनही भरपूर धुळीने माखलेले आमचे शूज, विस्कटलेले केस, त्यात वार्‍याने अडकलेल्या काड्या आणि थकलेले चेहरे. एकंदरीत असा अवतार हिल्स स्टेशनवर त्यांना अपेक्षित नसावा. असो.
आता आर्थर सीट वरून तोच समोरचा नजरा न्याहाळू लागले. कित्येक वेळा इथून हा नजारा पाहिला होता, पण आजच्या त्या पाहण्यातलं एक वेगळ समाधान आता मिळत होतं. दर्‍या खोर्‍यातलं
घनदाट अरण्यातलं अलौकिक वैभव पाण्यातलं समाधान फक्त या घाटवाटातला प्रवासच आपल्याला देतो. अतिशय मनोहारी विहंगम नजारे या दर्‍या खोर्‍यात उतरल्या शिवाय आपल्याला कधीच अनुभवता येणार नाही हे मात्र खरंय....!! 

आजुबाजूला कितीही बघण्यासारखे सुंदर दृश्य असले तरी आम्हाला बस कडे जाणे भाग होते. कारण इथून पुढे बारा किलोमीटर अंतरावर जाऊन जेवण करायचे होते एक बस आधीच पुढे गेल्याने आम्हाला ही निघणे गरजेचे होते . इथे एका महाबळेश्वर रेस्टॉरंट मध्ये STF टीम ने खूप छान  बनवलेला पुलाव दही बुंदी सगळ्यानी मस्त पैकी ताव मारला. थर्मास मध्ये मसाला चहा भरून घेतला पुढे वाटेत घेण्यासाठी . 

ही सुंदर घाटवाट STF मुळे अनुभवता आली त्यासाठी STF... सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन पुणे यांचे मनापासून खूप खूप आभार... 🙏🚩



* आर्थर सीट ला 'मढी महल' असे नाव आहे.
* एकूण ट्रेकला सात ते आठ तास लागतात.
* वाटेत कुठेही पाण्याची सोय नसल्याने 3lit पाणी     जवळ बाळगणे आवश्यक आहे.
* घुमटी ला पाण्याची सोय होऊ शकते पण तिथपर्यंत पोहोचायला बरीच दमछाक होते.
* घनदाट जंगल असल्याने फुल पँट फुल शर्ट असावा.
* खाली दिलेल्या लिंक वर या ट्रेक चा पूर्ण video पाहू शकता.
https://youtu.be/vwGtMbfy19Q
🚩 ........ सुरेखा पवार....... 🚩








Comments

  1. अप्रतिम वर्णन, फोटो पण सुसंगत आहेत. घरी बसून ट्रेक चा अनुभव घेतला असे वाटते

    ReplyDelete
  2. सुंदर फोटोग्राफी, आणि अप्रतिम वर्णन, पुढचा वेळी मी नक्कीच सहभागी असेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक