बेलाग सुळका.... कोथाळीगड

निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल आणि त्याची वेगवेगळी रूपे अनुभवायची असतील  तर, मान्सून ट्रेक ला पर्याय नाही. आम्हा ट्रेकर्सना मान्सून ट्रेक म्हणजे पर्वणीच! खरं तर वर्षा ऋतुची सुरूवात अनुभवण्यासारखी असते. वातावरणातील बदल आणि सर्वत्र पसरत चाललेली हलकीशी हिरवळ मन प्रसन्न करते. नेहमी प्रमाणे फोना ग्रुपने या वर्षातला पहिला मान्सून ट्रेक 18 जून ला आयोजित केला. त्याप्रमाणे आमचा 40 जनांचा ग्रुप पुण्यातून सकाळी साडेसहा ला लोणावळा-खोपोली मार्गे कर्जत कडे रवाना झाला. साधारण पुणे ते कर्जत दोन तास लागतात.

हा किल्ला रायगड जिल्ह्यात येत असुन उंची साधारण 3100 फुट आहे. हा किल्ला गिरी दुर्ग प्रकारात येत असुन भीमाशंकर डोंगर रांगेत आहे. कोथाळीगड हा कर्जत पासून 20 कि. मी. अंतरावर आहे. आम्ही कशेळे मार्गे अंबिवली या गावात उतरलो.  ग्रुप लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सुचना दिल्या व हर हर महादेव च्या गजरात अंबिवली गावातून ट्रेक ला सुरुवात केली.
अंबिवली तून गडाकडे जाणारी वाट...

आजिबात पाऊस नसल्याने ऊन आणि दमट हवे मुळे सर्वजण घामाघूम झाले. डिहाईडरेशन होऊ नये म्हणून लिंबू सरबत, पाणी, एनर्जी ड्रिंक थोड्या थोड्या वेळाने घेत रहावे.  हि वाट मोठी आणि मुरबाड आहे. येथून मोटरबाईक पण जातात.
या ठिकाणाहून एक तास चालल्या नंतर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं पेठ गांव दिसू लागते. गडाच्या पायथ्याशी पेठ गांव आहे. या गावाच्या नावावरून या गडाला 'पेठ' चा किल्ला असे ही म्हणतात.
पेठ गांव

येथील एका घरांतून पिण्याचे पाणी घेऊन गडाची चढाई सुरु केली.


सुरुवातीला झांडामुळे छान सावली मिळाली बरे वाटले. पण आता झाडं ही कमी आणि सावली ही नाही. ऊन खूप तापू लागल्याने अक्षरशः आम्ही भाजून निघत होतो. एक तर चढाई, दमटपणा त्यामुळे घामाच्या धारा निथळत होत्या. आता कोथाळीगड नजरेच्या टप्प्यात आला. किल्ल्याची विशाल कातळकडा 'बेलाग सुळका' जणू काही इतिहासाची साक्ष देत उभा होता.
कातळ कडा...

हि चढाई दमछाक करणारी आहे तरी, वाटेवरील चाफ्याची झाडं, करवंदाची झाडं, अजूबाजूची हिरवळ वाटचाल सुखावून टाकतात.

वर पोहचल्यावर समोरच कातळात खणलेल्या गुहा दिसतात. प्रथम देवीची गुहा, पाण्याचं टाकं, आणि डावीकडे प्रशस्त अशी भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देत उभे असलेले नक्षीदार खांब, आणि चार ठिकाणी गोलाकार खळगे आहेत. इथे वटवाघळांच्या विष्ठे चा उग्र वास येतो.
गुहा....गुगल फोटो कॉपी

गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळाच्या आत एक भुयार आहे आणि या भुयारात खालून वर जाण्यासाठी पायर्‍या खणलेल्या आहेत. हे भुयार आणि त्यातील पायर्‍या कोथळ्या प्रमाणे दिसतात, म्हणुन याचा उल्लेख कोथळा ( kothala means removed intestine from stomach ) असा करतात. यामुळे याला कोथळागड किंवा कोथाळीगड म्हणतात.कोथळ्यातील पायर्‍या....

तापलेले ऊन, दमटपणा मुळे दमछाक करणारी वाट आणि घामाघूम झालेले सगळे एक एक करत सर्वजण माथ्यावर पोहचलो. तेव्हा तेथील गार वारा, आणि सगळीकडे वाढलेली हिरवळ पाहून तर अतिशय सुखद अनुभव आला.
गडमाथा


जेवण झाल्यावर पूर्ण गडमाथा मस्तपैकी फिरुन घेतला आणि सुरु झाली फोटो फोटो फोटोग्राफी........
येथुन माथेरान चे पठार, नागफणी, पदरगड, प्रबळगड, कलावंतीण, माणिकगड ईरशाळगड दिसतात.

खरंतर मान्सून ट्रेक चा आमचा प्लान वरुन राजा ने पार धुडकावून लावला होता. पूर्ण ट्रेक सुर्य नारायणाचं दर्शन घेतच झाला यामुळे प्रत्येकी चार बाॅटल पाणी ही लागले. कधी एकदाचा पाऊस येतो असे झाले होते सर्वांना.
दिवसभर पावसाची वाट पाहुन पाहून शेवटी पावसाची प्रतीक्षा जवळजवळ सोडून दिली आणि गड उतरण्यास सुरूवात केली. एका ठिकाणी रॉक पॅच येतो तिथे सुळका उतरताना काळजीपूर्वक उतरावे.

सुळका उतरून खाली आले की डाव्या बाजूला थोडे चालत जाऊन समोरुन कातळ कड्याचा नजारा पहावा. आणि तिथे बसुन समोर दिसणार्‍या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यावा.



गडपायथा गाठतो न गाठतो वरूनराजाची आमच्यावर कृपा झाली. आधिच पावसाची वाट पाहुन अधीर झालेल्या आमच्यावर या मधुर घनांची बरसात झाली. आम्ही चिंब मनसोक्त भिजत ट्रेक पुर्ण केला आणि आमचा मान्सून ट्रेकचा  प्लान..  हेतू.. सफल झाला.. 👍


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक