चिल्ड् डुंबा... देवकुंड धबधबा

कातळधरा चा थरार अनुभवल्या नंतर मी अगदी रोमांचित होऊन गेले होते. आता दोन महिने झाले पायाला कसली तंगडतोड  नाही,अशा तंगडतोडीतून दुखणाऱ्या पायांची वेदना खुप छान हवी हवीशी वाटते. कित्येक दिवसात या सह्याद्री
चे दर्शन झाले नाही की मनाला अगदी रुखरुख लागते. खुप वेड लावले या डोंगरवाटानी, सह्याद्रीच्या कुशीत का एकदा शिरले की याची ओढ वाढतच जाते. तरीही मनाला, पायाच्या भिंगरीला थोडी आवर घालावी लागते; काय करणार आपल्याला सगळंच करायचं असतं ना! घर जबाबदाऱ्या सण उत्सव इ. असो, माझ्यासाठी तर विक पॉईंट ठरतायत या डोंगरवाटा.
    ह्या  सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा , अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड', आणि या कुंडात तुफान कोसळणारा जिथे पावसाळ्यात जाण्याचा विचार पण करता येत नाही अशा प्लस व्हॅलीतून खाली येणारा रौद्रभिषण धबधबा.... म्हणजेच "देवकुंड धबधबा"!!!!!!!!!" Natural Water Bathtub of God" आणि त्यात डुंबण्याचा योग आलाच....

       5 नोव्हेंबर ला फोना ग्रुप ची बस आम्हा 33 वेड्याना गुंडाळून भिरा कडे निघाली. सकाळी 6 वाजता तळेगावातून तर काहीना निगडीतून, डांगे चौकातून उचलत उचलत फेज थ्री तुन बाहेर पडुन घोटावड्यातुन माझ्या आवडीच्या  ताम्हीणी घाटाला लागली. या घाटातील मनमुराद जंगल भटकंती मी फोना ग्रुप बरोबर अंधार बन चा ट्रेक करुन दोन वेळा अनुभवली. त्यामुळे अशी भटकंती मला खूप आवडू लागली आहे,इतकी की विचारु नका... पावसाळ्यात तर खुपच... कधी भरुन आलेल्या ढगांमधे,कधी दाटलेल्या धुक्यामधे , कधी रिमझिमणाऱ्या धारामधे, तर कधी ओल्याचिंब सरी मधे अक्षरशः वेड लावणारा ताम्हीणी घाट 👌
यावेळी ट्रेकला दोन परदेशी महिला ट्रेकर सहभागी झाल्याने तर फोना ला इंटरनॅशनल लुक आला होता. त्यामुळे  सर्वांमध्ये जरा जास्तच उत्साह संचारला होता. अशा वेळी जरा वेगळी एक्साईटमेंट येतेच.

नेहमीप्रमाणे बस मधे ग्रुप कडुन सर्वांना इडली चटणी नाष्टा देण्यात आला. पोलंड वासियानी तर आवडीने खाल्ला. शीवसागर इथे सर्वांनी मस्त थंडीत ताम्हीणी घाटात गरमागरम चहाचा अस्वाद घेतला. घाटातल्या थंडीत चहाची लज्जत काही औरच..... आणि चहा सोबत सेल्फी नाही झाला तर नवलच!

जस जसा घाट उतरु लागलो तसा हवेतील फरक जाणवू लागला, पूर्ण घाट उतरल्यावर दमट हवेने व नाररयनाणे आम्हाला घेरले आणि कोकणात आल्याची जाणिव झाली. एका बाजूला कोकण तर दुसऱ्या बाजूला पश्चिम घाट आणि मधोमध देवकुंड धबधबा...
भिरा धरणाजवळ विठ्ठलवाडी या 70 घरं असलेल्या छोट्याशा गावी हा धबधबा आहे. इथे गाईड घेतल्या शिवाय देवकुंड ला आत प्रवेश नाही,तसेच इथे सर्वांची नोंदणी करुन घेतात, कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत व होतात; आॅगस्ट मधे तर 6ते8 लोकांनी आपले प्राण गमावले होते. गाईड आणि नोंदणी आवश्यक आहे. 10:30 ला शिव गर्जनेने ट्रेक सुरू झाला. वाट झाडीतून सुरु झाली पुढे थोडीशी चढण व नंतर गवताची कुरणं दिसु लागली पण ती आता पिवळी होऊ लागलेली.

वाटेवरून जाताना एक दोन कौलारू घरं खुप सुंदर भासली. याच वाटेवर दोन ठिकाणी गावातील लोकांनी छोटेखानी पाणी सरबत खाऊच्या टपऱ्या मांडल्या होत्या. आता गवताची कुरणं संपून जंगल वाट सुरू झाली, तेवढीच उन्हापासून थोडी सुटका. पुढे एक छान मोठा ओहोळ लागला पण कोरडाच मोठ मोठे दगडगोटे  तेही छान दिसत होते. पावसाळ्यात हेच ओहळ कसले भरधाव वेगाने वाहत असतात. जंगलाची ही वाट धरणाच्या कडेकडेने देवकुंडा कडे जाते. पावसाळ्यात मात्र हिच वाट पाण्याखाली गेलेली असते. त्यावेळी अजुन वरच्या वाटेने जावे लागते. यानंतर दुसरा आणखी एक भला मोठा ओहोळ लागतो पण तोही शांत, मात्र इथे वरुन येणारं पाणी अजुन तरी वाहत होतं. दऱ्या खोऱ्यातून दगड धोंड्यातून वाहत आलेले हे थंड व गोड पाणी पिऊन मी तृप्त झाले . हे पाणी अल्कलाइन वॉटर दुसरं शहाळं जणू. इथे रिकामी बाॅटल भरून घेतली व पूर्ण ट्रेक मध्ये तेच पाणी प्यायले, नॅचरल मिनरल वॉटर.


पुढच्या ओढ्यावर तर एक लाकडी पुल बांधलेला दिसला पावसाळ्यात ट्रेकर्सना याचा वापर करता यावा म्हणून, पण तो कमकुवत झाला आहे.

पाय बुडतील इतक्या पाण्यातून दगड गोट्या तून ओढा पार केला कि इथुन दाट जंगल सुरु होते. इथुन अर्ध्या तासाची दमवणारी चढण आहे. हा चढ जिथे संपतो तिथुन समोरच भव्य असे दोन कातळ दिसतात. आणि या दोन कतळांना वेगळं करणारी मोठी सांध दिसते, तीच प्लस व्हॅली.

अंधार बनातून वाहून येणारं सगळं पाणी या व्हॅलीतून खाली येतं आणि तयार होतो रौद्ररुप धारण केलेला ;तरीही स्वतःच्या भन्नाट सौंदर्याने वेड लावणारा असा हा धबधबा. आणि त्याच्या या कोसळणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेला मोठाच्या मोठा पन्नास फुट खोल खड्डा म्हणजे देवकुंड आणि यामध्ये पडणारे पाणी प्रचंड वेगाने पुढे वाहून नेते ती कुंडलीका नदी. पावसाळ्यात हिचा वेग पाहून तर धडकी भरेल. पण आता ती कोरडी होती.

अंधार बन ट्रेक च्या वेळेस वरुन जी दरी दिसत होती तिच ही कुंडलीका दरी पाहताक्षणी डोळे विस्फारतील, तेव्हांच ठरवलं ह्या दरीतून एकदा तरी ट्रेक करायचा, आणि आज मी या दरीत उभे राहून त्या अंधारबन ला खुणावत होते.
या दरीत कुंडलीका नदीत उतरले की लगेच समोर प्लस व्हॅली दिसते. पण ज्याच्या साठी इथवर आलो तो देवकुंड काही नजरेस पडेना, इतकां हा आत लपून बसलाय. मग नदीतून थोडं वरच्या बाजूला गेलं की समोरच हिरव्या रंगात भासणारे स्वच्छ नितळ देवकुंड दिसते. आता पाऊस पूर्णपणे थांबल्याने वरुन पडणारा धबधबा बऱ्यापैकी कमी झाला होता. कुंडातील पाणी अतिशय थंड इथल्या दमट हवेतून व उन्हातून चालत आलेल्या जिवाला कुंडात उतरण्याचा मोह कसा आवरता येईल. आणि डुंबण्याचा आनंद तरी कसा सोडणार.

 त्यामुळे सर्वांनी जास्त आत न जाता चिल्ड डुंबा डुंबा अनुभवला. हे कुंड पन्नास फुट  खोल असल्याने खुप आत जाऊच नये.
आणि या चिल्ड डुंबा डुंबा नंतर एक बॅनर क्लिक तो बनता ही हैं.

कुंडात खेळून दमलेल्या जिवांना लयी जबराट भुक लागली होती, मग काय आलो खाली अन् बसलो कुंडलीका च्या कोरड्या पात्रात. आणि इथेच बसुन अणलेल्या  एकमेकांच्या जेवणाचा अस्वाद घेतला. पोलंड वासियांनी इकडच्य जेवणाचा आनंद घेतला. आश्या भटकंतीतले जेवन खुप रुचकर लागते.

जेवण झाल्यावर नविन ट्रेकर्सना ग्रुप बद्दल माहिती सांगण्यात आली व सर्वांची ओळख करून घेण्यात आली. परतताना हाच चालून आलेला पल्ला पार करायचा होता. पण या सुंदर ठिकाणाहून परत फिरण्याचं मन होईना. तरीही देवकुंडाला निरोप देऊन परत निघालो. आता दुपारचे सव्वा तीन झाले होते. परतताना वाटेवर ठिक ठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा उचलणारे ग्रुपमधील लष्करी सर, निकाळजे सर, शुक्ला सर व दीपिका विनोद आणि बाकी मेंबर्सनेही प्लास्टिक उचलण्यास हातभार लावला.
प्रत्येकवेळी सरकार ने काय केलं पाहिजे किंवा हे सरकारचं काम आहे असा विचार करण्यापेक्षा , प्रत्येकाने स्वयंशिस्तीने वागले पाहिजे.
 निदान प्रत्येकाने स्वतःपुरता तरी विचार करावा की, मी कुठेही प्लास्टिक कचरा करणार नाही आणि कोणाला करु देणार नाही. असा स्टॅन्ड प्रत्येकाने घेतला तर आपल्या निसर्गाला कसलीच हाणी पोहचणार नाही. पण दुर्दैवं असं की हि मानसिकता कुठे दिसत नाही. म्हणून निसर्गप्रेमी ट्रेक दरम्यान प्लास्टिक कचरा गोळा करून आणतात. खरं म्हणजे लोकसहभागाने कितीतरी गोष्टी सुकर होतात. त्यामुळे लोकसहभाग वाढावा.
ट्रेक दरम्यान गोळा केलेला प्लास्टिक कचरा

संध्याकाळी पाच वाजता ट्रेक पूर्ण झाला व आम्ही बस कडे परत आलो पण अजुन काही मेंबर्स परत येई पर्यंत काहीनी धमाल, काहीनी फोटोग्राफी केली तर काहीनी सुर्यास्ताचा आनंद घेतला.

सुर्यास्ताचा आनंद घेऊन बस परत ताम्हीणी कडे निघाली. बस मध्ये येताना व जाताना कोणी शांत बसेल तर शप्पथ... अंताक्षरी ची धमाल व वेगवेगळ्या गेम ची मजा मस्ती त्यामुळे सगळे कसे टवटवीत असतात. यावेळी मुंबई आयडॉल प्रतिक ने तर त्याच्या एक से एक गाण्याने काय मैफिल गाजवली... क्या बात है प्रतिक मान गये उस्ताद!!!!! 😉 असा हा धमाल ट्रेक ग्रुप लिडर मंदार सर, मनोज सर, व सर्पमित्र निकाळजे सर यांच्या नेतृत्वाखाली मस्त पार पडला. ग्रुप लिडर... मनोज राणे व मंदार थरवल पोलंड वासी समवेत.

यावेळी  दोन परदेशी ट्रेकर्स फोना ट्रेकिंग ग्रुप बरोबर आले होते. कारण ग्रुप आहेच असा... जबाबदार व सुरक्षित. आता बाहेर चे लोक सुध्दा इतक्या विश्वासने येतात, हिच या ग्रुप ची खासियत.
    परदेशी ट्रेकर्स आणि त्याही महिला, खुप नवल वाटलं आणि स्वतः ची लाजही, कारण आपल्या अजुबाजुला इतका सुंदर निसर्ग असुन देखील ती पाहण्याची अनुभवण्याची आपल्याकडे क्षमता सुध्दा नसावी, दुर्दैव आपलं. आपल्या कडील महिलांच सगळं आयुष्य रांधण्यात वाढण्यात जाणार आहे का? या परदेशी भटक्या ना निसर्गातलं सर्व चालतं कोणत्याही सोई सुविधा वाचून त्यांच काही अडत नाही, हि मानसिकता आपल्या कडे कधी येणार. हे लोक आपल्या देशात एवढ्या दुरुन येतात, आपल्या कडील डोंगरवाटा धुंडाळतात, किती वेड असतं या लोकांना, कुठुन येत असेल एवढं वेड, निसर्गाची ओढ माणसाला कुठे कुठे भटकंती करायला लावेल सांगता येत नाही. त्यासाठी निसर्गाची ओढ असावी लागते. आपल्या कडे ती दिसत नाही. त्यांच्याकडे ती रुजवली जाते व जपली ही जाते ;निसर्गापेक्षा सुंदर दुसरं काही असुच शकत नाही,हि शिकवण दिली जाते. म्हणून आपण हि येणाऱ्या पिढी मध्ये हि शिकवण रुजवूया त्यासाठी आपण आधी निसर्ग समजुन घेऊया. 

Comments

  1. Precisely written & ended with nice sunset pic. Re-taken to Devkund ...keep it up

    ReplyDelete
  2. Chikat dhamal Maja to diws kadhi wisru shkt nhi loka khup sundr asta aikala hota pn kiti n kashe he tya diwshi dolane baghitl pn so sweet of u all😊😊😊mis u

    ReplyDelete
  3. Nice bhtkanti surekha मी पुण्यातील जवळपास सर्व किल्ल्यावर गेलो त्या मध्ये लोहगड ,तिकोना पेठ,विसापूर, पुरंदर, शिळीम,वगैरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक