आषाढातला..... लोभस राजगड

         आषाढातले ढग बरसू लागले की थांबायचं नाव घेत नाहीत, आणि बरसायचे थांबले तरी आकाशातली त्यांची गर्दी कायम मग त्या नारायणा च्या दर्शनालाही तरसवतात. अशा ह्या पावसात रानावनात पानाफुलात आणि रसिक वेड्या मनामनात पावसाची काव्य बहरु लागतात, आणि अशावेळी आमची भटकी पावलं या डोंगर दऱ्याकडे धावतात. पावसाच्या सरीत प्रत्येकाला चिंब व्हायचंच असतं पण मला तर डोंगर दऱ्यात बेभान होऊन कोसळणाऱ्या सरींची ओढ...!!! मग
रोजची जगरहाटी जरा झुगारून शिरतेच सह्याद्रीच्या कुशीत आणि झोकून देते स्वतःला ओल्याचिंब करणाऱ्या पायवाटेवर....

दाटुन आलेलं आभाळ, हिरवेगार डोंगर आणि त्यांना अडलेले ढग... असे हे गर्द हिरव्या डोंगराला अडलेले ढग मला विलक्षण आवडतात. कधी घाटातून तर कधी डोंगर पायथ्यापासून अतिशय सुंदर दिसतात. मग अशावेळी वाटतं जाऊन बसावं त्या डोंगर माथ्यावर आणि मनसोक्त भटकावं त्या ढगांच्या दाटीत.... हो ना.. तुम्हालाही वाटतं ना..! मला तर नेहमीच वाटतं, आणि हे सगळं आपण पावसाळी ट्रेक मधे अनुभवु शकतो की, आयला! खरच की मग कशाला बसता घरात, करुन बघा की एखादी डोंगर भटकंती... नाहीतर मी आहेच आपल्याला भटकून आणायला.
एक सेल्फी नेचर के साथ...

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला कणखर महाराष्ट्र आणि याच अफाट पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपली भव्यता दिमाखात मिरवणारे आपले गडकोट...एरवी यांच दिसणारं राकट रांगडं रुप पावसाळ्यात अगदीच लोभसवानं आणि सुंदर दिसायला लागतं. अशाच एका गडकोटा पैकी एक गडांचा गड राजगड याची भव्यता एका कटाकक्षात सुद्धा सामावून घेता येत नाही. पावसाळ्यात मात्र त्याच्या या मुळातच असलेल्या राकट रुपात कमालीचा फरक जाणवतो. आता कसं सुंदर नटलेलं , ढगात लपून बसलेलं लोभसवानं रुप पहायला मिळतं. गडकोट आणि लोभस खरच वाटत नाही ना! हो ना! मला पण अगदी असंच वाटलं गड किल्ले म्हंटलं की त्यांचा रांगडेपणा डोक्यात येतो.

मी, सुशील आणि आमचे मित्र नितीन व स्वाती अशी आमची चौकट कार मधून 22 जुलै ला सकाळी साडेसात ला पुण्याहून पुणे - बंगलोर हाय वे वर धावू लागली.

राजगड किल्ला पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. पुणे - बंगलोर हाइवे वर खेड शिवापूर नंतर पुढे उजव्या हाताला नसरापूर फाटा लागतो. इथून राजगड 30 कि.मी वर आहे. नसरापूर फाट्यावरुन आत आलो की दहा मिनिटांच्या अंतरावर डाव्या बाजूला 'स्वराज्य मिसळ हाऊस' आहे. इथली मिसळ अतिशय चविष्ट....!! बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती आणि पुण्यातून निघाल्यापासुन आता एक तास झाला होता,साडेआठ वाजलेले. सकाळी फक्त चहा घेऊन निघाल्या मुळे भुक ही लागलेली आणि अशा या गारठलेल्या वातावरणात इथली गरम गरम मिसळ आणि वाफाळता वेलची युक्त चहा... वा क्या बात है...!! अशी संधी तुम्हीही सोडू नका. कधीही या बाजूला आलो की या चविष्ट मिसळीचा स्वाद घेतल्या शिवाय आम्ही पुढे जातच नाही.


नाष्टा करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो. वाटेत छोटी छोटी खेडी लागतात. या वाटेवरील सुंदर हिरवळ...

साधारणपणे 25 कि.मी गेल्या नंतर डाव्या बाजूला गुंजावने इथूनही गडावर जाण्यासाठी मार्ग आहे तिला चोरवाट म्हणतात. ही वाट तशी कठीण आहे तरीही मला नेहमी ही वाट आवडते. पण आता पावसाळ्यात या वाटेने जाऊ नये आधीच कठीण वाट त्यात काही काही ठिकाणी अगदीच निमुळत्या आणि पावसामुळे तर या वाटा निसरड्या होतात. पावसाळ्यात ही रिस्क न घेतलेलीच बरी. म्हणुन आम्ही पाली दरवाजा ने राजगड करायचा ठरवले. त्यामुळे गुंजावने ला न जाता पुढे डावीकडे वाजेघर ला गेलो. वाजेघर वरुन पाली दरवाजा ने राजगड गाठता येतो. या मार्गाला राजमार्ग म्हणतात,कारण या मार्गाने त्या काळात हत्ती, घोडे पालख्या गडावर घेऊन जात म्हणून मार्ग सोपा आहे. पावसाळ्यात हा मार्ग सोईस्कर आहे. मुख्य रस्त्यापासून वाजेघर 7 कि. मी वर असुन रस्ता कच्चा आहे. इथेच आम्ही गडाच्या पायथ्याशी सोयीस्कर रित्या रोडच्या बाजूला गाडी लावून टाकली. तिथे एक आज्जी बांबू काठी विकत होती. पाऊस लागू नये म्हणून तिने डोक्यावर इरलं घेतलं होतं अतिशय सुरेख दिसत होतं. या भागात भात शेती करतात तेव्हा हे इरलंच खुप वापरतात. लाल काष्टा आणि डोक्यावर घेतलेलं इरलं हतात कोयता व्वा रुपडं काय छान दिसत होतं...

इथे या मार्गावर दोन्ही बाजूला भात शेती मस्तपैकी पाण्यात उभी होती, इथल्या शेतकऱ्यांची कल्पकता तर पहा... भात शेतीला बांध घातलेलेच पण तिथेही दगड रचून छोट्या छोट्या धबधब्याचं स्वरूप दिलेलं, त्यामुळे शेती खुप सुंदर दिसत होती.
हेच ते छोटे छोटे धबधबे आणि भात शेती....


सकाळ पासुन पावसाची रिपरिप चालूच होती. रेनकोट, सॅक फुल पॅक होउन आमची चौकट ओल्याचिंब झालेल्या राजमार्गावरुन चालू लागली.  या मार्गावर बांबूची खुप झाडं दिसतात.  या वाटेने थोडावेळ चालल्या नंतर समोरच एक भलं मोठं हिरवंगार पठार लागतं आणि दोन्ही बाजूला घनगर्द प्रपात वाहः काय सुरेख दृश्य सगळ्या सृष्टी सौंदर्याचा मिलाफ  परत परत डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. हा फोटो सौजन्य.. गुगल


पठार संपल्यानंतर पुढे अजुन एक वळण येते. पावसामुळे वाट चांगलीच घसरडी झाली होती त्यामुळे स्वतः ला सांभाळत पाऊल टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. अता इथून पुढची वाट जंगलातून सुरू होते. चढण असल्याने ही वाट दमवणारी आहे आणि या पायवटेवरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे तिची अत्यंत बिकट अवस्था घसरडी निसरडी, कुठेही पाऊल टाकलं तरी चांगलच सटकतं. अशावेळी वाहत येणाऱ्या मातकट पाण्यातून चालणं सोयीस्कर वाटतं,म्हणुन आम्ही पण तेच केलं. पावसाळी ट्रेक मधे जंगलातून चालतांना आणखी एक त्रास म्हणजे छोटे छोटे उडणारे किडे सतत तोंडावर येतात काही काही वेळा चावतात. एक हात तोंडावर येणारे किडे हुसकावून लावण्यासाठी अन दुसरा काठी साठी पाय सटकू नये म्हणून... अशी दुहेरी कसरत करत सावकाश एक एक टप्पा चढत गेलो.
जंगलवाट

अता बऱ्यापैकी जंगलवाट संपली होती. तसेच पुढे काही अंतर चढून गेल्यानंतर एका टप्प्यावरुन नजारा काय अप्रतिम दिसतो म्हणून सांगू...!! तुम्हीच बघा ना...


खाली उजव्या हाताला गर्द हिरवाईने नटलेली दरी आणि दुरुन दिसणारे उंचावरून फेसाळणारे धबधबे आणि डाव्या बाजूला ढगात लपून बसलेली उंच डोंगर रांग. आम्हाला या ठिकाणी धोधो वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येत होता, पण वाहणारं पाणी कुठेच कोणाला दिसेना. मात्र हा मोठा ओढा असणार हे नक्की.

अता बऱ्यापैकी गडाचा निम्मा टप्पा संपला होता. इथून पुढे गडावर जाण्यासाठी  पायऱ्या सुरु होतात. पायऱ्या म्हंटलं की नको वाटतं डोंगरातली ओबडधोबड चढण परवडेल पण पायऱ्या माझ्या तर अगदी जिवावर येतं. तसं तर हा राजमार्ग यावरुन हत्ती घोडे पालख्या गडावर घेऊन जाण्यासाठी बनवलेल्या उंच उंच पायऱ्या त्यामुळे गुडघ्यावर ताण तर येतोच आणि ट्रेकची थोडी मजाही कमी होते. मात्र आमचे मित्र नितीन आणि स्वातीने पायऱ्यांची मजा घेतली.

निम्म्याहून अधिक पायऱ्या चढून गेलं की परत एकदा डाव्या बाजूला एका ठिकाणी थांबुन समोरचा नजारा पाहिला आहाहः! समोरची खोल दरी पूर्णपणे ढग आणि धुक्याने भरुन गेलेली... आपले दोन्ही हात पसरून व डोळे मिटून दोन मिनीट शांत उभं रहायचं, आणि हळूहळू डोळे उघडायचे जसं काही 'नभ पायाशी उतरल्याचा भास'.. काय भन्नाट फिलिंग येतं राव... सही दिसतं किती पाहू नी किती पाहू असंच होतं. आम्ही चौघांनी हा भन्नाट अनुभव घेऊन पुढे निघालो.

पायऱ्या चढत चढत एका वळणावर एक उंच कातळ दिसतो हाच तो गडाचा शेवटचा टप्पा आणि इथून डाव्या बाजूच्या दरीत वाऱ्यामुळे एका लयीत डोलणारं उंच गवत अतिशय सुंदर दिसतं. या पाषाणाला वळसा घालून पुढे गेलं की इथूनच पाली दरवाजा म्हणजे राजगडाचं प्रवेश द्वार दिसते.


 पण दाट धुकं आणि ढग इतकं दाटून आलं होतं की; आम्ही अगदी दरवाजा जवळ पोहचलो तेव्हा कुठे आम्हाला कळलं की पाली दरवाजा आला आहे. हळूहळू धुके कमी होऊ लागलं आणि भव्य प्रवेशद्वार दृष्टीस पडलं त्याबरोबर सर्वांनी एकच जल्लोष केला. भक्कम प्रवेशद्वारावरुनच गडाची भव्यता लक्षात येते. वर्षाऋतू सगळी सृष्टी सजवून टाकते, त्यामुळे या कमानीच्या काळ्या दगडावर वाढलेली बारीक नक्षीदार हिरवळ सुध्दा कमालीची सुंदर दिसते.
पाली दरवाजा

गडावर प्रवेश केला तसं ढगांनी आम्हाला चारही बाजूंनी घेरलं......जणु त्याने आम्हाला कवेतच घेतलं ना!
सावकाश एक एक पाऊल टाकत आम्ही पुढे निघालो... आणि समोर जे काही दिसलं ते लवकरच उर्वरित भागात सांगेल मित्रानों..!!!!
छायाचित्रण सुशील आणि नितीन यांची कमाल.
उन्हाळ्यातील पाली दरवाजा.. फोटो सौजन्य... गुगल


वाचत रहा... माझे ट्रेकमयी भटके अनुभव....

लवकरच घेऊन येते राजगड ची बाले किल्ल्याची भन्नाट भटकंती.....!!!!!

सह्यवेडीसुर

Comments

  1. अप्रतिम ब्लॉग! अतिशय सुंदर वर्णन,

    ReplyDelete
  2. अप्रतिम ब्लॉग! अतिशय सुंदर वर्णन,

    ReplyDelete
  3. WoooooooW.!
    Well written.
    Keep it up! 👍

    ReplyDelete
  4. सुरेख....मी पण असाच प्रेम वेडा सह्याद्री चा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक