जुळ्या किल्ल्यांची सफर... किल्ले राजमाची

नमस्कार मित्रांनो....  खूपच दिवसांनी आपण भेटत आहोत. या vlog च्या नादात blog लिहण्या मधे बराच गॅप पडला, त्यासाठी  क्षमस्व!!
सध्या ट्रेकिंग व्लॉग... Videos बनवतेय , त्यामुळे ब्लॉग लिहायला वेळ कमी पडतोय. सध्या माझे यू ट्यूब चॅनेल सुरू केल्यापासून विडियो एडिटिंग तंत्र शिकण्यात आणि केलेले ट्रेक विडियो एडिट करण्यात बराच वेळ जायचा त्यामूळे हाssssss मोठा गॅप....  'Sahyavedi Sur' .. या माझ्या चॅनेल वरून तुमच्या पर्यंत पोहोचवलेल्या सर्व ट्रेकिंग विडियो ना तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रतिसादा बद्दल मनापासून आभार....🙏 असेच प्रेम राहू द्या... 😊
 मागील चार महिन्यात केलेल्या सर्व ट्रेक चे ब्लॉग इथून पुढे तुम्हाला वाचायला मिळतील.


या पावसाळ्यात राजमाची करायचा खूप मनात होतं. . .. गूगल बाबावर त्याचे मान्सून चे फोटो पाहून तर कधी एकदा जातोय असं झालं होतं आणि काही ना काही कारणानी कॅन्सल होत होतं. झाsssलं पावसाळा संपला पण वेळ काही जुळून येईना. मग सण समारंभ दिवाळी सुट्टीही संपली आणि एकदाचा योग जुळून आला तो 25 नोव्हेंबर 2018 ला, आणि निघालो ही..... रविवारी भल्या पहाटे 5:30 ला मी आणि सुशील ने आपआपली गाठोडी पाठीवर टाकली आणि खूपच थंडी असल्याने फूल पॅक होऊन आमच्या हुड़िबाबा सकट पुणे सोडले. गाडी बॉम्बे पूना हाइवे ला जशी लागली तसे थंड गार वार्‍याचे फटके बसु लागले, पहाटेचा थंडगार वारा चांगलाच अंगाला झोंबू लागला. एका तासात लोणावळा गाठला, पण थंड वार्‍याने डोकं बधिर झालं. गरमा गरम चहाने परत बधिर झालेलं डोकं जागेवर आलं. लोणावळा तून आमचा मोर्चा आम्ही आता राजमाची च्या दिशेने वळवला. इथून राजमाची फक्त 16 km वर आहे, वाटेत ड़ेल्ला adventure लागते. या ड़ेल्ला च्या समोर भल्या मोठ्या एक से एक पार्क केलेल्या गाड्या पाहून हसूच आले. मनात म्हंटले या ड़ेल्लात कसले adventure करणार देव जाणे... खरा adventure तर इथून पुढे आपल्या सह्याद्रीत आहे असो.



ड़ेल्ला पासून 2 km चा रस्ता सोडला तर इथून पुढचा राजमाची पर्यंत चा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे... पुणे ते लोणावळा 60 km अंतराला एक तास आणि लोणावळा ते राजमाची 16 km अंतराला सव्वा तास कारण तुमच्या लक्षात आलेच असेल. गाडी बरोबर पाठीची जी काय वाट लागते ती शब्दात सांगणे कठीणच! सांगायचा मुद्दा असा की गड़ किल्ल्यांकडे जाणारे रस्ते अत्यंत बिकट अवस्थेत आहेत,जाताना एका बाजूला उल्हास नदीचं खोरं म्हणजेच उल्हास व्हॅली लागते. मागच्या कातळधार धबधबा या ब्लॉग मधे उल्हास व्हॅली बद्दल तुम्ही हिचं निसर्ग सौंदर्य अनुभवलेलं आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे ही सुंदर हिरवीगार दरी व्यवस्थित पाहता आली. बर्‍या पैकी पुढे गेल्यावर फणसराई हे गांव लागते इथेच पहिला पूल लागतो.
फणसराई गांव...


आपल्या वाहनाची काहीशी दुर्दशा टाळायची असेल तर बरेच जण इथेच गाड्या लावुन पुढे पाच किमी. अंतर पायीच जाणे पसंत करतात. बर्‍याच वेळा ऐकण्यात आलं होतं, की राजमाची ला बाइक वरून जाण्यात खरी मजा आहे म्हणुन आम्ही आमची हुडीबाबा इथे न लावता पुढे घेऊन जायची ठरवली. अंतर फक्त पाच कि.मी. आहे, वाटलं 10 मिनटात पोहोचू पण कसलं काय  45 मिनिटात आमच्या हुडीबाबा नी अजब गजब कसरती करत आम्हाला गडाच्या पायथ्याशी कसंबस पोहचवल, म्हणून मानोमन तिचेपण आभार मानले. या पाऊण तासात आमची बेक्कार वाट लागली हाडं खिळखिळी झाली. गाडीवरून उतरून आपापल्या सॅक पाठीवर टाकून दोन पावलं टाकतो न टाकतो तोच देहाचा नुसता खुळखुळा झाल्यागत चालल्या सारखं वाटलं.  पण काही म्हणा भारी मजा आली.... दाट जंगलातून जाणारी ती दगड धोंड्याची वाट खूप छान होती, पण लयी कसरती करून घेतल्या आमच्या कडून. पावसाळ्यात जंगलातून वाहत येणारे मोठ मोठाले ओहळ या मार्गात आडवे जातात म्हणुन या वाटेवर अंतरा अंतराने चार पुल बांधलेले आहेत. पुढे गेल्यावर वाटेत बापरे! 😱असे म्हणे पर्यंत भला मोठा  काळा नाग अचानक आडवा गेला,आमची रोडवर ची बाइक कासरत चालू असल्याने या नगोबाने अर्धवट च दर्शन दिलं आणि तो पलीकडच्या झाडीत सर्रर करून गुडूप पण झाला. अशा दुर्मिळ दर्शनाचा योग नागोबा कवा कवा च देतो बघा, त्यात त्याचा फुटू काढायचा तर लयी लांब ची गोष्टये.
श्रीवर्धन गड़.. 🚩

समोरचं श्रीवर्धन गडाचं रूपडं पाहून खुळखुळा झालेला देह पाच मिनटात पूर्ववत झाला. गडाच्या पायथ्याचा परिसर खूप सुंदर दिसतो. किल्ले राजमाची वर दोन स्वतंत्र बाले किल्ले आहेत म्हणुन मी यांना 'जुळे बाले किल्ले' असेही म्हणते हीच या ट्रेक ची खासियत आहे पहिला लागतो तो श्रीवर्धनगड़ हा आकाराने मोठा व उंच आहे. दुसरा आहे मनरंजन गड़ हा थोडा लहान आहे. सुरवातीलाच
गडावर जाणारी पायवाट बांधुन काढलेली आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी निम्म्या पर्यंत पायर्‍या बांधलेल्या आहेत. त्यामुळे गड़ चढण्यास सोपा आहे. या गडाची प्रवेश कमान खूप सुंदर दिसते, दरवाज्याच्या दोन्ही बाजूला पहारेकरी यांच्या देवड्या आहेत. गडाच्या आतिल बाजूस गडावरील अवशेष पाहायला मिळतात.
गडावरील प्रवेशद्वार...
 गडावरील अवशेष...


 तसेच पुढे गेल्यावर वाटेत एक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. ही गुहा म्हणजे दारूगोळा कोठार. गडाची तटबंदी अजून शाबूत आहे. गडाच्या माथ्यावर मजबूत ध्वजस्तंभ दिमाखात फडफडत असतो . बाले किल्ल्याच्या माथ्यावरून ढाक चा थरारक सुळका व खाली सुंदर असा तलाव दिसतो.
श्रीवर्धन गड़ माथा... 🚩


इथून खाली येताना डाव्या बाजूला चिलखती बुरूजा कड़े वाट जाते ही वाट पूर्णपणे वळलेल्या परंतु उन्हामुळे सोनेरी झालेल्या गवतमाधुन जात होती. वार्‍या मुळे सोनेरी गवताची एका लयीत होणारी हालचाल खूप सुरेख वाटली. हा चिलखती बुरुज दुरूनच इतका सही दिसत होता क्या बात है! पण त्याच खरं सौंदर्य पावसाळ्यातच!! निसर्गाचं अतिशय देखणं रूप हा बुरूज घेऊन येतो, माघारी निघायचं नावच घेत नाही, असा हा चिलखती बुरुज.
चिलखती बुरुज..... 🚩


पावसाळ्यात कातळ धार धबधब्या कडून दिसणारा हाच तो राजमाची चा बुरुज आणि या बुरुजावरुन बरोबर समोर कोसळणारा कातळधार धबधबा. आज याच चिलखती बुरुज वरून आम्ही, समोर दिसणारा आणि पावसाळय़ात रौद्ररूप धारण करणारा कातळ धारचा सध्या निव्वळ कातळ आणि त्याच्या आजुबाजुला दाट वेढलेलं जंगल पाहत होतो, तरीही किती छान दिसत होता. अप्रतिम असं ते दृश्य डोळ्यात साठवून आम्ही मनरंजन साठी श्रीवर्धन उतरु लागलो.
मनरंजन गड़...

श्रीवर्धन गड़ पूर्णपणे उतरून समोर असलेल्या महादेवाच्या मंदिराच्या मागील बाजूने झाडीतून मनरंजन गडाकडे वाट जाते. गड़ चढण्यास लहान असल्याने अर्ध्या तासात बालेकिल्ल्याच्या गोमुखी दरवाज्यात पोहचलो. गडावर किल्ले दाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. पाण्याची टाकी आहेत तसेच गडाची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. या गड़ माथ्यावरून ड्यूक्‍स नोज, कर्नाळा दिसतो.
मनरंजन गडाचे प्रवेशद्वार
 गडावरील मंदिर

सह्याद्रीच्या डोंगर रांगेत लोणावळ्यापासून अवघ्या 16 कि.मी अंतरावर आणि घाट वेशीवर किल्ले राजमाची आहे. त्याकाळी कोकणातून बोरघाट मार्गे पुण्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतुक चालायची, या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी आणि कर वसूल करण्यासाठी कोकण व घाट वेशीवर असलेल्या या किल्ले राजमाची चा उपयोग केला जात. राजमाची च्या एका बाजूस कोकण तर दुसर्‍या बाजूला पवन मावळ प्रांत त्यामुळे या किल्ल्यावरून एका बाजूला तुंग, तिकोना, लोहगड विसापूर तर दुसर्‍या बाजूला पेठ, चंदेरी, ढाकचा बहिरी, सिद्धगड़ दिसतात त्यामुळे लष्करी दृष्ट्या योग्य ठिकाण.
दोन्ही गड़ चढण्यास सोपे आहेत एका दिवसात राजमाची होतो हाडे खिळखिळी होऊ द्यायची असतील तर नाहीतर नाही. पावसाळ्यात याचं निसर्ग सौंदर्य भुरळ पाडतं हे नक्की...!!!!


Comments

  1. भटकंती... एक स्तुत्य उपक्रम आहे.. खुप छान माहिती मिळाली... आपल्या उपक्रमाला शुभेच्छा

    ReplyDelete
  2. सरस्वती सुरेखाच्या माध्यमातून असेसुंदर लेख लिहिते आणि सुरेखा गड फिरायला दमत नाही आणि सद रीकरणासही
    खूप स्तुत्य उपक्रम
    हॅट्स ऑफ
    सुरेखा गडकरी आणि किल्ल्यांची राणी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद जीवन 🚩🚩🤓🤓

      Delete
  3. उत्तम लेखन शैली

    ReplyDelete
  4. Khup Sundar lihate Surekha di....

    ReplyDelete
  5. Sahi...����

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक