थरारक कलावंतीण प्रबळगड ट्रेक 🚩 14 मार्च 2021

आज सगळीकडे नकारात्मकता भरलेली असताना सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप ने ट्रेक च्या माध्यमातून कायम सकारात्मकता टिकवून ठेवली आहे. एका छोट्याश्या जंतू मुळे सगळं जग फिटनेस बद्दल जागृत झालेलं आहे. त्या विषाणू ने आज जगाला दाखवून दिले की, तुम्हाला निसर्गातून लाभलेलं शरीर  किती निरोगी सुदृढ आणि सक्षम ठेवलं पाहिजे. त्यात भटकंतीची आवड असेल तर क्या बात है.... फिटनेस साठी वेगळं काही करण्याची गरज नाही, ट्रेक करा स्वस्थ रहा मस्त खा....!!!


खरं तर प्रत्येक रविवारी STF चे ट्रेक असतात पण नेहमीच जमेल असे नाही पण महिन्यातून दोन ट्रेक करण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे....... 

STF चा 14 मार्च 2021 चा प्रबळ गड परिक्रमा ट्रेक व दुसरा कलावंतीण, प्रबळ गड ट्रेक. इच्छा तर दोन्ही कडे जाण्याची होती पण दोन दुर्ग एकाच दिवसात करून पहायचे असल्याने कलावंतीण प्रबळगड बुक करुन टाकला व स्वतःला आजमावून पहायचे ठरवले.
त्याप्रमाणे 13 March ला पुण्यातून रात्री 10 :30 ला दोन्ही ट्रेक च्या दोन बस पनवेल ठाकूर वाडी कडे निघाल्या.
आम्ही ठाकूर वाडीत रात्री दोन वाजता पोहचलो अपेक्षित वेळे पेक्षा एक तास लवकर... भाऊंची ट्रेक विषयी माहिती सूचना ऐकण्यास दोन्ही ग्रुप वेळे वर एकत्र जमले. . प्रबळ माची पर्यंत दोन्ही ग्रुप एकत्र जाणार, असे ट्रेक लीडर सुरेंद्र भाऊ ने सांगितल्या त्याप्रमाणे...  तिथून म्हणजे माची वरून परिक्रमा वाले उजव्या बाजूने म्हणजे प्रबळ च्या दिशेने मार्गस्थ होतील आणि आम्ही गडकरी कलावंतीण च्या दिशेने. आज आम्ही गडकरी कारण (कलावंतीण आणि प्रबळ गड करणारे) म्हणून आज गडकरी.... आज आमच्या गडकरी ग्रुप ला एवरेस्ट वीर भगवान चवले यांचे नेतृत्व लाभले हे आमचे थोर भाग्य समजतो. तर भाऊ कडून ट्रेक विषयी माहिती सूचना समजून घेऊन भगवान दादा च्या दमदार आवाजात शिव गर्जना घेऊन पहाटे 3:15 वाजता ट्रेकची सुरुवात झाली. अमावस्याची रात्र असल्याने काळ्या मिट्ट अंधारात टॉर्च च्या प्रकाशात पदभ्रमण सुरू झाले. 


एवरेस्ट वीर... भगवान चवले


ट्रेक  लिडर.... सुरेंद्र भाऊ 

चालायला सुरुवात झाली नाही तोच दहा मिनिटांत घाम निघायला तयारच बसला होता की काय लगेच बाहेर पडायला सुरू झाला. कोकणातील हवा म्हणजे दमट हवा आणि या हवेत दुसरा काय होणार आम्हा पुणेकरांना 🤭 जरा म्हणून दम निघत नाही, लगेच शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन सुरू ऊन नसताना 😂😂 एक तासात आम्ही प्रबळ माचीवर पोहचलो परिक्रमा वाल्यांनी मोजून दहा मिनिट दम घेऊन बरोबर आणलेला थोडासा खाऊ खाऊन त्यांच्या त्यांच्या वाटेला लागले, पण आम्हा गडकरींना अजून तासभर तरी माचीवरच थांबावे लागणार होते. कारण 5:30 नंतरच कलावंतीण वर जाण्याची परवानगी दिली जाते असा वनखात्याचा नियम आहे आणि तो अगदी योग्य आहे. 

Prabalmachi


आजचा ट्रेक ठाकूर वाडीतून कलावंतीण करून प्रबळ गड आणि परत ठाकूर वाडी असा मस्त ट्रेक होता. कलावंतीण 2,250 फुट उंच तर प्रबळ गड 2500 फुट उंच... माथेरान डोंगर रांगेत हे दोन किल्ले येत असून गिरीदुर्ग या प्रकारात येतात. दोन्ही किल्ले अतिशय सुंदर असून चढाई उतराई मध्यम आहे. प्रबळ गडाला मुरंजन गड असेही म्हणत होते. या गडाच्या पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमला गडी नदी तर दक्षिणेला पातळ गंगा ने वेढलेला आहे.

कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हटले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी लोकांची वस्ती असून, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. आम्ही आधी कलावंतीण सर करून परत खिंडीतून आडव्या वाटेने प्रबळ कडे रवाना असा आजचा ट्रेक आहे. कलावंतीण चा इतिहास पण सांगते तुम्ही नाही विचारणार पण सांगायची हौस काय करणार 😂 तसा बराच आहे पण मी थोडक्यात सांगणार..
कोण्या एका राजाची आवडती राणी होती कलावंती ती आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून तिच्या साठी या शिखरावर त्याने राजवाडा बांधला होता म्हणे पण मी विचार करत होते एवढ्या अवघड ठिकाणी का म्हणून बांधला असावा राजवाडा 🤔आणि दुसरे असे की राजवाड्याचे पुसट अवशेष ही दिसत नव्हते. या दुर्गाशी माची वरील आदिवासींचा फार जवळचा संबंध आहे होळी पौर्णिमेला हे लोक एकत्र येऊन या दुर्गा वर नृत्य करतात.
कलावंतीण एक शिखर आहे व हे शिखर त्याच्या खतरनाक पायर्‍या साठी प्रसिद्ध आहे. म्हणून अंधारात सर करणे योग्य नाही. कारण या दुर्गा च्या पायर्‍या 80 डिग्री मधे कोरलेल्या आहेत आणि दोन्ही पायरी मधील अंतर दोन दोन फुट इतके आहे आणि भरीस भर म्हणजे मागे दरी 😱😱 चुका ध्यान तो गयी जान अश्यातला प्रकार... पायर्‍या कोरनारे कारागिरांना मनापासून सलाम.
कलावंतीण दुर्ग

आता पहाटेचे साडेचार वाजलेले आम्ही गडकरी एक तासभर माचीवरच आडवे पडून राहिलो पण तिथल्या प्रत्येकाच्या घरातील कोंबड्याने बांग द्यायला सुरु केली आणि कोणाचा म्हणून डोळा लागू दिला नाही, पण ती बांग ऐकण्याची एक वेगळीच मजा यायला लागली. नैसर्गिक अलार्म दुसरा काय, जसं फ़टफटू लागलं तसं त्यांचे आरवणे थांबले कसे असते ना...

हाच तो कोंबडा....

साडेपाचच्या सुमारास  पहाटेचा मंद प्रकाश  पडू लागला तसे आम्ही एक एक करत सगळे जण कलावंतीण कडे मार्गस्थ होऊ लागलो. पहाट झाली तरी टॉर्च चा आधार घ्यावा लागत होता. माची वरून पंधरा मिनिटातच प्रबळ आणि कलावंतीण च्या खिंडीत पोहचलो, 

खिंड


इथूनच आमच्या आवडीच्या, व कलावंतीण च्या खास आकर्षण असलेल्या त्या खतरनाक पायर्‍या चा टप्पा सुरू झाला... चार वर्षांपूर्वी मी हा ट्रेक केला होता तरीही तो पायऱ्यांचा थरार परत अनुभवण्याची मजाच वेगळी. 80 कोनात कोरलेल्या पायर्‍या असल्याने शांतपणे घाई गडबड न करता एक एक पायरी आपले दोन्ही हात आणि पाय यांचा पुर्णपणे वापर करत करत चढली तर काहीही धोका नाही, कारण ट्रेकिंग चा आनंद आपल्या बरोबर इतराना पण घेऊ देता आला पाहिजे. आपली व इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन फोटो ही काळजीपूर्वक काढले तर कसलाच धोका नाही. खिंडीतून 20 मिनिटांत माथ्यावर पोहचलो तेंव्हा सहा वाजून गेले होते. आजूबाजूच्या डोंगरातून अलगद पसरत जाणारे धुके आणि त्यामुळे किंचित निळसर धुरकट (मी त्यांना नीलधुकट डोंगर म्हणते) दिसणार्‍या डोंगर रांगांच्या पूर्वेकडील आकाशात सूर्योदयापूर्वी बदलत चाललेली रंगछटा खूप सुंदर दिसू लागली.

नील धुकट डोंगर


कलावंतीण माथा




एक एक करत सगळे गडकरी कलावंतीण च्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले. इथून दहा ते पंधरा फुटाचा रॉक पॅच आहे तो चढूनच आपल्याला गड माथ्यावर पोहोचता येते. आमच्यातील काही हाडाचे ट्रेकर्स रोप नसताना तो रॉक पॅच काळजीपूर्वक चढून  माथ्यावर गेले. काही वेळाने एका ग्रामस्थांनी रोप आणून दिला तोच रोप ग्रुप लीडर व इतर ट्रेकर्स ने धरून बर्‍याच जणांना माथ्यावर घेतले व व्यवस्थित खालीही उतरवले. ज्यांना जमणार नाही त्यांनी उगाच धाडस करू नये असे आवर्जून भगवान दादा, बापू, सांगत होते . पण एका दाम्पत्याने त्याकडे दुर्लक्ष करून एका महिला ट्रेकर ने चढण्याचा प्रयत्न केला 6 फुट चढली नाही तोवर तिचे संतुलन बिघडले असावे किंवा घाबरली असावी तिचा तोल गेला व ती घसरून पडलीच बाकीचे ट्रेकर्स असल्याने फार काही  झाले नाही पण पायाला चांगलीच इजा झाली असावी. कारण तिच्या पायाला सूज आली होती बहुतेक फ्रॅक्चर झाले असावे तिला आता तो पायही टेकवता येत नव्हता लगेच तिच्यावर प्राथमिक उपचार करून देण्यात आले व त्या दाम्पत्याला माची पर्यंत जाण्यास सांगितले. एक तर ते दाम्पत्य प्रथमच ट्रेक ला आले होते. खरं तर अश्या ठिकाणी आपल्या ग्रुप लीडरचे ऐकावे. मी तर म्हणेन प्रथम ट्रेक करित असाल तर  इतर ट्रेकर्स च्या हालचाली, पायवाटा, चढ उतार यांचे जास्तीत जास्त निरीक्षण करीत राहावे.. . जेणे करून आपल्याला त्याप्रमाणे ट्रेकिंग चा अनुभव मिळत राहिल. त्याआधी नवीन ट्रेकर्स नी छोटे छोटे ट्रेक करून स्वतःच्या क्षमता वाढवायचे प्रयत्न करावे. अश्या अवघड ट्रेक ला काहीही अनुभव नसताना नको ती जोखीम पत्करू नये, साहस तर करूच नये नाहीतर असे अपघात फार त्रासदायक ठरू शकतात. 

साधारण एक तासानंतर आम्ही कलावंतीण उतरायला सुरुवात केली. पायर्‍या चढण्याचा जो थरार आहे तेवढाच उतरताना चा थरार थोडी भीती छान अनुभवता येतो.

80 डिग्री... मध्ये कोरलेल्या पायर्‍या...




कलावंतीण वरून प्रबळ गडाची मांड्याची सोंड दिसते. ती पायर्‍या उतरेपर्यंत आपल्याला खिंडीत पोहोचे पर्यंत सामोरी असते. खिंडीतून सरळ खाली उतरणारी वाट प्रबळ माचीवर जाते व डाव्या बाजूची आडवी वाट आपल्याला प्रबळ गडाच्या बैल शिंग घळीत घेऊन जाते.

कलावंतीण कडून डाव्या हाताचा ट्रॅव्हर्स....

याच ट्रॅव्हर्स ने आम्ही प्रबळ कडे निघालो या पूर्ण वाटेवर डाव्या बाजूला प्रबळ चा उंच कातळ तर उजव्या बाजूला दरी आणि पायवाटेवर मधे मधे पडलेले वरच्या कातळाची खडक दगड त्यामुळे वाट अवघड नसली तरी सांभाळून चालावे लागते. या वाटेवर कातळात बर्‍या पैकी अंतरा ने दोन गुहा लागतात. त्या दोन्ही गुहेत माझे ट्रेकिंग फ्रेंड बापू झुरंगे व धनंजय जाऊन आले.. 

गुहा नंबर 1

ही कलावंतीण च्या जवळची गुहा आहे. त्यांच्या माहिती नुसार पहिली गुहा.... या गुहेत रांगत जाता येईल असाच मार्ग आहे हा साधारण तीस फुट व पुढे तीन चार फुट प्रत्येकी तीन नागमोडी वळणे घेते व समोर दहा बाय वीस आणि उंची अडीच फुट इतकीच आयताकृती गुहा आहे. परत येतांना तसेच रांगत रांगत बाहेर यावे लागते. 

दूसरी गुहा.....

ही प्रबळ गडाची गुहा आहे. ही गुहा घळीच्या थोडे अलीकडे साधारण पंधरा फुट वर चढून गेल्यावर कातळात कोरलेली आहे... ही गुहा ही पाहिल्या गुहा सारखीच आहे म्हणजे प्रथम रांगता येण्याइतपत तीस फुट भुयारी मार्ग त्याचे पुढे पाहिल्या सारखी गुहा परत भुयार व त्याच्या पुढे पंधरा बाय तीस (अंदाजे) गुहा आहे पण तिथे वटवाघूळ च्या विष्ठा खूप असावी कारण खूप दुर्गंध येत होती. यांच्या दोघांच्या सांगण्यावरून या गुहा किंवा भुयार कशाकरता केले असावे याचा काही अंदाज येईना पण मनुष्य निर्मित गुहा असल्याने याचा कालखंड बौद्ध काळाशी जोडता येऊ शकतो. 

गुहेतील वटवाघूळ

आम्ही नऊ पर्यंत बैल शिंग घळीत पोहचलो. या घळीत एक स्टॉल आहे. या दुकानाच्या दोन्ही बाजूने प्रबळ वर जाता येते. इथे घळी तून वर प्रबळ गडावर जाताना मोठमोठाली दगड पार करावे लागतात दमट हवे मुळे चांगलेच दमायला होते. पुढे पडझड झालेल्या पायर्‍या ही लागतात या घळीतला पूर्ण दगड जांभा प्रकारचा आहे. प्रवेशद्वार अतिशय बिकट अवस्थेत आहे तिथेच अजून एक स्टॉल लागतो. इथून पुढे थोड्याच वेळात आम्ही गडावर पोहचलो. इथून दोन पायवाटा लागतात. डावीकडच्या बाजूने गेल्यास मांड्याची सोंड येते. दुसरी काळा बुरुज कडे जाते. आधी आम्ही मांड्याच्या सोंडेची पायवाट पकडली. या सोंडे वरून कलावंतीण अतिशय देखणा दिसतो. कलावंतीण हा प्रबळ गडाचाच भाग असला तरी त्याच्यापासून बराच वेगळा... प्रबळ प्रचंड मोठा पठारी तर कलावंतीण उंच निमुळते शिखर हे एक वैशिष्ट्य. 

मांड्याची सोंड.....

आता सकाळचे दहा वाजत आले होते सगळ्यांना पेटपूजा करण्याचे वेध लागले म्हणून इथेच सोंडे पासून जवळ च्या सावलीत बरोबर आणलेला खाऊ एकमेकांना घेत देत खाऊन घेतला. पहाटे पासून पायपीट केलेला जीव पेट पूजे नंतर अगदी तृप्त झाला. अश्या वेळे ची भूक एक वेगळेच समाधान देते.

आता साडेदहा होत आलेले सगळ्यांच्या मते काळा बुरुज कडे जाण्याचे ठरले. प्रबळ वर जिथे प्रवेश केला तिथेच परत येऊन उजव्या
बाजूची पायवाट धरली. थोडे पुढे गेल्यावर एके ठिकाणी शीव लागली, शीव म्हणजे भरपूर दगड एकाच ठिकाणी रचलेले असतात व त्याच्या दोन्ही बाजूला दोन वाड्या किंवा दोन गाव असतात.
शीव... 

ही वाट हळू हळू छान दाट जंगलात जाऊ लागली. काळा बुरुज पर्यंतची नव्वद टक्के वाट जंगलाने व्यापलेली आहे आणि बरेच पठार कार्वी ने व्यापलेले आहे, त्यामुळे तेवढा उन्हाच्या झळा लागल्या नाही. वाटेत दगडाचे जाते काही विविध आकाराचे रचलेली दगडी एके ठिकाणी समाधी असे अवशेष दिसले. इथे एके ठिकाणी झाडांवर एक विशिष्ट घरटे दिसले त्याला मुंग्यांचे घरटे असेही म्हणतात. 

मुंग्यांचे घरटे.....

पुढे डाव्या बाजूला मोठा तलाव लागतो पण सध्या तो कोरडा पडला होता व त्यामधे बरीच झाडी झुडपे उगवली असल्याने आम्हाला तलाव लवकर ओळखू येत नव्हता. तसेच पुढे गेल्यावर  बर्‍याच वेळाने चार राजवाडे दिसतात हे राजवाडे ठराविक अंतरावर बर्‍या अवस्थेत आहे. 

Hairy tree.....

तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गणेशाचे मंदिर लागले .

इथून अजून काळा बुरुज दोन एक कि. मी. वर होता. आता बुरुजा कडे जाणारी वाट रुक्ष रुक्ष होऊ लागली आणि या बाजूला जंगल कमी, कमी होऊ लागले.  वाटेत एके ठिकाणी दगडी मचाण दिसते. काही ठिकाणी चौथरे ही दिसले. जस जसा काळा बुरुज जवळ येऊ लागला तस तसे सगळीकडे ओसाड ओसाड आणि विखुरलेले दगड दिसतात. 



काळा बुरुजचे काही नामोनिशाणही नाही फक्त एक उंचवटा आहे त्यावर थोडे दगडी अवशेष शिल्लक आहेत. काळा बुरुज म्हणजे प्रबळ गडाचे शेवटचे टोक, इथून डाव्या हाताला खूप खालच्या बाजूला समोर अजून एक बुरुज दिसतो त्याची बर्‍या पैकी तटबंदी आहे पण तिकडे जाण्याची वाट काही दिसली नाही. ऐकुन माहीत होते की या काळ्या बुरुजाच्या खालून एक घळी सारखी वाट त्या खालच्या पठार असलेल्या बुरुज वर जाते. 

खालचा बुरुज....




काळा बुरुज वरून एकीकडे माथेरानचे सुंदर पठार, तर समोर इर्शाळ गड सतत लक्ष वेधून घेत होता. खाली मोरबे धरण दिसते. इथे दोन पाण्याची टाकी आहेत. याशिवाय गडावर कुठेही पाण्याची सोय नाही. बाकी गडावर सुरुवातीला एक स्टॉल आहे तिथेच पाणी मिळू शकते. काळा बुरुज कडून येतांना डाव्या बाजूला एक पायवाट बोराट्याच्या सोंडे कडे जाते व तिथून ही गडावरून खाली उतरून जाता येते पण ही वाट नळीची कठीण वाट असल्याने व वेळे अभावी आल्या वाटेने परत ठाकूरवाडीत उतरायचे ठरवले व त्याप्रमाणे आम्ही सगळे त्याच जंगलातून परत येऊन प्रबळ गड उतार होऊ लागलो. पूर्ण कलावंतीण दुर्ग  पूर्ण प्रबळ गड करून आम्ही दुपारी 2 वाजता ठाकूर वाडीत पोहचलो.  🚩 🚩 कलावंतीण वर ज्या महिला ट्रेकर चा पाय फ्रॅक्चर झाला होता ते दाम्पत्य प्रबळ मची वर आम्हाला भेटले. ट्रेकिंग मधील स्ट्रेचर वर काही ग्रामस्थांनी त्यांना माची पर्यंत आणून सोडले होते. इथून पुढे एवरेस्ट वीर भगवान दादा व इतर नव्या दमाच्या 5 ते 6 ट्रेकर्स ने त्या महिलेला प्रत्येकाने आलटून पालटून  पाठीवर घेऊन ठाकूर वाडी पर्यंत आणले. स्ट्रेचर ऐवजी हा पर्याय वापरल्याने लवकरात लवकर सगळे खाली पोहोचले. ट्रेक चा जास्त सराव नसताना उगाच नको तिथे साहस करायला जाऊच नये. प्रत्येकाला आप आपले लिमिटस माहीत असतात. नको तिथे नको ते साहस  अपघाताला आमंत्रण असते हे कायम लक्षात ठेवावे. जिवावरचे पायावर बेतले इतकेच. ट्रेक नंतर सर्वांना STF कडून चितळे ची बाकरवडी आणि छान चवदार सुमधूर मसाले ताक देण्यात आले... हे ताक पिऊन थकवा कुठल्या कुठे निघून गेला. सात ते आठ तासाची 17km ची कोकणातील उन्हातून केलेली मस्त तंगडतोड खूप छान आणि निवांत झाली. 🚩 🚩 

ब्लॉग मधील छायाचित्रे.  _बापू झूरंगे. 



महत्वाचे.....
कोकणातील उन्हाळ्यातील 7 ते 8 तासाच्या ट्रेक साठी...
4 लिटर पाणी
Electrol, लिंबू पाणी
काकडी, द्राक्ष, ऑरेंज, टोमॅटो, गाजर, आवळा असणे आवश्यक आहे.

Sahyavedi Sur... ट्रेक चा पूर्ण video खालील लिंक वर पाहू शकता
https://youtu.be/NKVTgD6hngk

सुरेखा पवार. 🚩 

8208947409 











Comments

  1. खुप छान लिहिलंय. काही इंग्रजी शब्दांऐवजी पर्यायी मराठी शब्द वापरावेत असे वाटते
    .

    ReplyDelete
  2. खुप छान लिहिलंय. काही इंग्रजी शब्दांऐवजी पर्यायी मराठी शब्द वापरावेत असे वाटते
    .

    ReplyDelete
  3. छान आहे लेखन,👍👍आवडलं बर

    ReplyDelete
  4. अवघड आहे ट्रेक...����

    ReplyDelete
  5. Well done��

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक